एनसीबीला गांजा आणि तंबाखूमधील फरक कळत नाही

मुंबई
 14 Oct 2021  223


-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा दावा

लोकदूत वेबटीम 
मुंबई 14 ऑक्टोबर 


अमली पदार्थ नियंत्रण पथकाने (एनसीबी ) आपले जावई समीर खान यांच्याकडून गांजा जप्त केल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी  न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत केला.

त्यामुळे एनसीबीने समीर खान आणि इतर दोघांवर एनडीपीएस कायद्याच्या २७(अ) कलमातंर्गत दाखल केलेला गुन्हा रद्दबातल ठरतो, असा दावा करत मलिक यांनी एनबीसीला गांजा आणि तंबाखू यातील फरक कळतो की नाही? असा सवाल केला.

अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपपावरून एनसीबीने १३ जानेवारी मलिक यांचे जावई  समीर खान यांना अटक केली होती. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने समीर खानसह करण सजनानी आणि राहिला फर्निचरवाला यांना साडेआठ महिन्यानंतर  म्हणजे २७ सप्टेंबर २०२१ रोजी जामीन दिला. यासंदर्भातील न्यायालयाचा लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर मालिक यांनी एनसीबीवर आज जोरदार निशाणा साधला.

१४ जानेवारीला एनसीबीचे कर्मचारी माझ्या जावयाच्या घरी छापा मारण्यासाठी गेले. छाप्यानंतर मोठ्याप्रमाणावर गांजा सापडल्याचे वृत्तवाहिन्यावरून दाखवण्यात आले. प्रत्यक्षात घरातून काहीच जप्त करण्यात आले नव्हते. तरीही माध्यमांना खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले, असा आरोप मलिक यांनी लागवला.

२०० किलो गांजा मिळालेला नाही, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. फक्त फर्निचरवालाकडे ७.५ ग्राम गांजा मिळाला. बाकी  हर्बल तंबाखू आहे, असे अहवालात नमूद आहे. एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही हे आश्चर्य असल्याचा दावा मलिक यांनी केला.

एनसीबीकडे तपासणी साहित्य असते. ज्यातून अंमली पदार्थ आहे किंवा नाही हे लगेच समजते. याचा अर्थ त्यांनी या सर्व गोष्टी तपासल्या होत्या, गांजा नव्हता, याची त्यांना माहिती होती. पण तरी जावयास अडकवण्यात आले, असा आरोप मलिक यांनी केला.

दरम्यान, मलिक यांच्या आरोपानंतर  एनसीबीचे क्षेत्रीय अधिकारी समीर वानखेडे यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. हे प्रकरण सध्या वरच्या  न्यायालयात आहे. अशा प्रकरणामध्ये आपण काही बोलू शकत नाही, असे वानखेडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
----------------------------------
सूडभावनेतून वक्तव्य: प्रविण दरेकर
जावयाला अटक झाल्यानंतर नवाब  मलिक यांची जनमानसात  बहुतेक बदनामी झाली. त्यामुळेच मलिक हे रोजच्या रोज केवळ सूडभावनेतून तपास यंत्रणाविरुध्द वक्तव्ये करत असतात, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली.