शरद पवार यांचा केंद्रावर हल्लाबोल

मुंबई
 13 Oct 2021  196

 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 13 ऑक्टोबर 

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे धोरण केंद्रातील भाजपा सरकारचे आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. पवार यांनी बुधवारी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटच्या नातेवाईकांवरतील आयकरचे छापे पडल्यानंतर पवारांनी आज प्रथमच भूमिका मांडली.

1 तास 2 मिनिटांच्या संवादात पवार यांनी अनिल देशमुखांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंतच्या मुद्द्यावर आणि मावळ ते उत्तर प्रदेशातील लखीमपूरमधील हिंसेवर भाष्य करत भाजपला चांगलेच धारेवर धरले.                     

 

पवार म्हणाले, सत्तेचा गैरवापर तिन्ही सत्ताधारी पक्षांविरोधात केला जात आहे. मुख्य घटकाऐवजी जवळच्या लोकांवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसते. राज्यातले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न २ वर्ष असफल झाल्यावर तपास यंत्रणांचा मार्ग स्वीकारल्याचे दिसते. थेट हल्ला करण्याऐवजी शासनात बसलेल्या लोकांच्या जवळच्या लोकांना भिती दाखवण्याचे धोरण आहे, असे पवार यांनी सांगितले. मात्र त्याबद्दल चिंता करण्याचे कारण नसल्याची पुष्टी पवार यांनी जोडली.


सीबीआय, आयकर, सक्तवसुली संचालनालय, अंमली पदार्थ विरोधी विभाग या यंत्रणांचा वापर राजकीय दृष्टीने केला जात आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर तत्कालीन पोलीस आयुक्तांनी आरोप केले होते. त्यातून देशमुखांना राजीनामा दिला. जबाबदार अधिकारी जबाबदार माणसावर बेछुटपणे आरोप करतो, असे पूर्वी कधी घडले नव्हते. देशमुख बाजूला झाले पण हे गृहस्थ गायब आहेत, असे पवार म्हणाले.


अनिल देशमुख यांच्या घरी आयकरने काल पाचव्यांदा छापा मारला. पाच पाचवेळा एखाद्या व्यक्तीच्या घरी जाणे कितपत योग्य आहे, असा सवाल पवार यांनी केला. अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी टाकलेल्या छाप्यावर पवार म्हणाले, पाहुणे येतात. एक, दोन तीन दिवस राहतात. आजचा सहावा दिवस आहे, असे सांगत अजीर्ण होईल इतका पाहुणाचार घेऊ नये, असा चिमटा पवारांनी काढला.


माझ्या तिन्ही मुलींचा कारखाना नाही. त्यांचा या सर्वांशी संबंध नाही. तरी तिकडे गेले, चौकशी केली. आमच्या मुलींनी विचारले, तुमच्या घरचे वाट पाहत असतील. त्यांनी सांगितले आम्हाला सूचना आहेत सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही. त्यामुळे आज सहाव्या दिवशीही दोन तीन ठिकाणी पाहुणे आहेत, असे पवारांनी सांगितले.


उत्तर प्रदेशातील लखमीपूर घटनेवर पवारांनी भाष्य केले. शेतकऱ्यांच्या जमावावर काही लोक गाडीतून येतात आणि त्यांना चिरडतात. असा प्रकार कधी घडला नव्हता. आपल्या मुलाचा संबंध नसल्याचे गृहराज्यमंत्री सांगत होते. मात्र त्यांच्या चिरंजीवाला त्यांच्याच पक्षाच्या सरकारलाच अटक करावी लागली. असे सांगून केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी पवारांनी केली.


पवारांनी यावेळी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. ते म्हणाले, मी चार वर्ष मी मुख्यमंत्री होतो पण माझ्या लक्षात कधी राहिलेही नाही. असे सांगतानाच सत्ता गेल्याची वेदना किती खोल आहे हे यातून दिसून येते, असे टोमणा पवार यांनी फडणवीस यांना नाव न घेता लगावला.


मावळमधील गोळीबाराच्या मुद्द्यावरूनही पवारांनी भाजपवर टिका केली. मावळमध्ये शेतकरी मृत्यूमुखी पडले. त्याला राजकीय पक्षाचे सत्ताधारी जबाबदार नव्हते. तो आरोप पोलिसांवर होता. फडणवीसांनी मावळ आणि लखीमपूरची तुलना केली. मावळच्या शेतकऱ्यांचा नाराजी सत्ताधाऱ्यांवर होती. पण नंतर यात सत्ताधाऱ्यांचा संबंध नसल्याचे मावळच्या लोकांच्या लक्षात आले. त्याला पुष्टी म्हणून मावळमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके 90 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले, असा दाखला त्यांनी दिला.


क्रुजवरील रेव्ह पार्टीच्या छाप्यावर पवारांनी भाष्य केले. मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स विभागाने जे अंमली पदार्थ पकडले त्याचे प्रमाण केंद्राच्या एजन्सीपेक्षा अधिक होते. राज्याचा विभाग दिलेले काम प्रामाणिकपणे करते. तर मुंबईतली केंद्राची एजन्सी सराकरला दाखवण्यासाठी करत असल्याची अशी शंका पवारांनी उपस्थित केली.


पवार यांनी यावेळी भारत-चीन तणावावर मत मांडले. चीनसोबतची बोलणी अयशस्वी झाली आहेत, असे सांगून सर्वांनी एकत्र बसून चीनबाबत सामुहिक भूमिका घेण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले. तसेच संरक्षण खाते जी काही भूमिका घेईल, त्याला विरोधक म्हणून आम्ही पाठिंबा देऊ, असे पवार यांनी स्पष्ट केले.

----------