एकनाथ खडसे यांना दिलासा

मुंबई
 12 Oct 2021  189

* पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
-पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वाॅरंट जारी
लोकदूत वेबटीम 

मुंबई 12 ऑक्टोबर 


एकेकाळी भाजपाचे फायरब्रँड नेते असलेले मात्र नंतर पक्षांतर्गत मतभेदांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या एकनाथ खडसे (जि. जळगाव) यांना मंगळवारी (ता.१२) मोठा धक्का बसला. पुण्यातील भोसरी येथील कथित जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात आज मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

या प्रकरणी मंदा खडसे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचा अर्ज फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली.

अंजली दमानिया यांनीच यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्याचवेळी एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला असून त्यांच्याबाबत पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारातील कथित घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. मात्र, एकनाथ खडसे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले होते.

एकनाथ खडसे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या ते मुंबई रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे ते आज सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. खडसे यांना अजून काही दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे, असे सांगत त्यांच्या वकिलांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी आणखी वेळ मिळावा, अशी विनंती केली.

एकनाथ खडसे यांची ही विनंती न्यायालयाने मान्य केली व या प्रकरणात पुढील सुनावणी २१ ऑक्टोबर रोजी ठेवली आहे.
--