अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयचे छापे

मुंबई
 11 Oct 2021  183

 

-सीबीआयने यापूर्वी मारले आहेत तीन छापे
-छापे मारण्यापेक्षा त्यांच्या घरी राहण्याचा राष्ट्रवादीचा सल्ला
लोकदूत वेबटीम 

मुंबई 11 ऑक्टोबर 


केंद्रीय तपास संस्था (सीबीआय) च्या पथकाने माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे विदर्भातील नेते अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानी सोमवारी (ता.११) पुन्हा छापेमारी केली. देशमुख यांच्या घरावरची सीबीआयची ही चौथी छापेमारी आहे.

देशमुख यांची वरळी येथील सुखदा या इमारतीत सदनिका आहे. तेथे आज सीबीआयचे अधिकारी पोचले. यावेळी देशमुख कुटुंबियांपैकी कोणी घरी नव्हते. गेले दोन महिने देशमुख गायब आहेत.

मनी लाँड्रीग (पीएमपीएल) प्रकरणी देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर प्रतीमाह १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर देशमुख यांना मंत्रीपदाचा राजिनामा द्यावा लागला होता.

देशमुख यांच्या घरावर इडीने ६ वेळा, सीबीआयने ३ तर आयकर विभागाने एकदा छापे मारले आहेत. ईडीने देशमुख कुटुंबियांची साडेचार कोटी रुपयांची मालमत्ता पूर्वीच जप्त केलेली आहे.
----------
कितीवेळा अनिल देशमुख यांच्या घरावर छापे मारणार, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. पुन्हा पुन्हा छापे मारण्यापेक्षा देशमुख कुटुंबियांना इतरत्र राहण्यास सांगा व तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी राहावे, असा उपरोधिक सल्ला जयंत पाटील यांनी दिला आहे.
-----------------