अनिल परब विरोधातील कृती रामदास कदम यांना भोवणार

मुंबई
 04 Oct 2021  199

 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 4 ऑक्टोबर 

राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांच्या मालमत्तांबाबतची कागदपत्रे शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याची कथित ध्वनीफीत पुढे आली आहे. मात्र परब आणि कदम यांच्यातील वाद जुन्या भाऊबंदकीचा असून त्यात पक्ष म्हणून शिवसेना मध्ये पडणार नसल्याचे समजते.


परब आणि कदम या दोघांचा जिल्हा रत्नागिरी आहे. रामदास कदम यांचे सख्खे बंधू सदानंद कदम हे परब यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. गेली ३० वर्षे परब आणि कदम भागिदारीत व्यवसाय करतात. रामदास कदम आणि त्यांचे बंधु सदानंद यांच्यात सख्य नाही. परिणामी, परब आणि रामदास कदम यांच्यात शत्रुत्व उद् भवल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. 


अनिल परब यांचे दापोली तालुक्यात मुरुड येथे हाॅटेल साई रिसाॅर्ट आहे. त्याचे कामकाज सदानंद कदम पाहतात. त्या रिसाॅर्टप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले आहेत. तसेच वांद्रे येथील परब यांच्या कार्यालयाबाबतही सोमय्या यांनी आरोप केले आहेत. त्याबाबतची कागदपत्रे रामदास कदम यांनीच सोमय्या यांना पुरवल्याचा आरोप आहे.


रामदास कदम यांचे पुत्र योगेश हे दापोलीचे (जि. रत्नागिरी) आमदार आहेत. दुसरा पुत्र युवा सेनेत सक्रीय आहे. तर कदम स्वत: विधान परिषदेवर आमदार आहेत. कदम यांच्यावर शिवसेना इतक्यात कारवाई करण्याची शक्यता नाही. कदम हे सेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी विविध मंत्री पदे भूषवली आहेत. ते विरोधी पक्षनेते सुद्धा राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाई हळुवारपणे केली जाईल, असे समजते.
रामदास कदम यांची विधानपरिषदेची मुदत १ जानेवारी २०२२ रोजी संपुष्टात येत आहे. कदम यांची विधान परिषद पुढे चालु ठेवले जाणार नाही. परिषद खंडीत करुन परब यांना अडचणीत आणल्याबाबतची त्यांना शिक्षा केली जाईल. त्यामुळेच कदम यांच्याबाबत सेना नेतृत्व मौन बाळगून आहे, असे शिवसेनेतील सूत्रांचा दावा आहे.


खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि  राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी रामदास कदम आणि किरीट सोमय्या यांच्यातील कथित संभाषणाबाबतची ध्वनीफीत नुकतीच जाहीर केली. मात्र रामदास कदम यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून आपल्याला बदनाम केले जात आहे, असा दावा केला आहे.

-------------