एसएनडीटी च्या कुलगुरूपदी डॉ उज्वला चक्रदेव

मुंबई
 11 Sep 2021  225

लोकदूत वेबटीम 

मुंबई 11 सप्टेंबर 
 
नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या  डॉ उज्वला श‍िरीष चक्रदेव यांची श्रीमती नाथ‍िबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी  शनिवारी डॉ उज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली. डॉ उज्वला चक्रदेव यांचा जन्म २७.०८.१९६२ झाला असून  राष्टसंत तुकडोजी महाराज नागपुर विदयापीठाच्या व्हीआरसीई येथुन वास्तुविद्याशास्त्र  ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविदयाशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. 
 
डॉ उज्वला चक्रदेव यांनी मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी. पर्यवेक्षक म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर ३६ वर्षांचा अनुभव लाभला आहे.
 
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या   कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी  यांचा  कार्यकाळ २ जूलै २०२१  रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांचेकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. 
 
कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी  छत्तिसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमुर्ती न्या. यतिंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. 
 पुणे येथील आयआयआयटीचे  महासंचालक डॉ. अनुपम शुक्ला व राज्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते. 

समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ उज्वला चक्रदेव यांची कुलगुरुपदी नियुक्ती केली.