मुख्यमंत्र्यांनी दिले कठोर कारवाईचे आवश्वास

मुंबई
 03 Sep 2021  252

मुख्यमंत्र्यांनी केले त्या बहादूर सहायक आयुक्ताचे कौतुक
-फेऱीवाल्यावर कारवाई करताना ठाण्यात झाला होता हल्ला

लोकदूत वेबटीम 

मुंबई  3 सप्टेंबर 

ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू...तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना दिल्या.

तुमच्यावर हल्ला करणाऱ्याला कठोर शासन केले जाईल. तुम्ही चिंता करू नका. फक्त लवकरात लवकर बरे व्हा,  सरकार आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

ठाणे महापालिका हद्दीत मागच्या आठवड्यात फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना  पिंपळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यात त्यांच्या उजव्या हाताची दोन बोटे तुटली होती. ती जोडण्यात डाॅक्टरांना यश आले आहे.
सध्या त्या रुग्णालयात उपचार घेत असून  उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.  तुमच्या प्रकृतीची मी रोज माहिती घेत असतो. काळजी करू नका ठणठणीत बरे व्हा, असेही ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्याकडून पिंपळे यांच्या प्रकृती बाबत माहिती घेत असतात. आज त्यांनी महापौरांच्या मोबाईलवरून  पिंपळे यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त विपीन शर्मा उपस्थित होते. पिंपळे यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असेही ठाकरे यांनी सांगितले.