राज्यपाल नियुक्त सदस्यातून खडसे शेट्टी वगळले ?

मुंबई
 02 Sep 2021  242

शेट्टी, खडसे यांचा पत्ता कट होणार

* विधान परिषदेवर पाठवायच्या दोन नावात होणार बदल

* नवी दोन नावे मात्र अजूनही गुलदस्त्यात

लोकदूत वेबटीम
मुंबई 2 सप्टेंबर

राज्यपाल नामनियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यासाठी शिफारस केलेल्या १२ नावांपैकी दोन नावे वगण्यावर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीत विचार चालु आहे. सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचे नाव वगळ्याचा निर्णय अंतीम झाला असून एकनाथ खडसे यांच्याबाबत मात्र मंथन चालु आहे.

६ नोव्हेंबर २०२० रोजी महाविकास आघाडीच्या सरकारने १२ सदस्यांची नावे राज्यपाल यांना मंजुरीसाठी पाठवली होती. त्यामध्ये काँग्रेस ४, राष्ट्रवादी ४ आणि शिवसेनेच्या ४ सदस्यांची नावे आहेत.  मात्र ती यादी अद्याप राज्यपाल यांनी मंजूर केलेली नाही.

बुधवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूल मंत्री राज्यपाल यांना भेटले. त्यावेळी पराभूत उमेदवारांना वगळ्याबाबत राज्यपाल यांनी सूचवल्याचे समजते. त्यातच स्वाभीमानीचे राजू शेट्टी सध्या आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. त्यामुळे शेट्टी यांचे नाव वगळण्यावर राष्ट्रवादीने निर्णय केला आहे.

राष्ट्रवादीचे दुसरे नेते एकनाथ खडसे यांच्या नावाला भाजपचा विरोध आहे. खडसे यांचे नाव वगळल्याशिवाय १२ सदस्यांची नावे मंजूर होणार नाहीत, असे संकेत राजभवनने राज्य सरकारला दिलेले आहेत. त्यामुळे खडसे यांचे नाव वगळायचे की निवडी प्रलंबित ठेवायच्या यावर सध्या राष्ट्रवादीत चर्चा चालु आहे.

एकुण, दोन्ही नावे वगळून भाजपशी तडजोड करत रखडलेली यादी मार्गी लावण्यावर महाविकास आघाडी सरकार निर्णयाप्रत आले आहे.

याबाबत अजित पवार यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘आम्ही पहिली १२ नावे मंत्रिमंडळाने दिली. असे बोलले जाते की नजिकच्या निवडणुकीत एखादी व्यक्ती पराभूत झाली असेल तर त्याला नेमले जात नाही अशी नवी माहिती पुढे आली आहे. यात तथ्य आहे का याची शहानिशा आम्ही करतोय. जर का अडचण आली तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील;
----------
माझे निर्णयाकडे लक्ष - राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची एक जागा द्यायची हा समझोता लोकसभा निवडणुकीच्या आधी झाला होता. दिल्लीत माझी पवार साहेबांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने एक लोकसभा मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा, अशी आमची मागणी होती. मात्र, त्याऐवजी विधान परिषदेची जागा देण्याचं पवार साहेबांनी मान्य केले होते. त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत जून २०१९मध्ये बारामतीत बैठक झाली तेव्हा राज्यपालांच्या नामनिर्देशित जागांसाठी माझे नाव समाविष्ट केले होते. माझ्या नावाबाबत आता जी चर्चा सुरू आहे, त्यात आम्हाला अजिबात रस नाही. दिलेला शब्द पाळायचा की नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसनं ठरवायचं आहे. स्वाभिमानीचा तो अधिकार आहे. माझे निर्णयाकडे लक्ष आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.