अनिल देशमुखांच्या जावयाला सीबीआय कडून अटक

मुंबई
 01 Sep 2021  230

सीबीआयकडून अनिल देशमुखाच्या जावयाची चौकशी
- अपहरण केल्याचा देशमुख कुटुंबियांचा आरोप


लोकदूत वेबटीम 

 मुंबई 1 सप्टेंबर 


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चुतर्वेदी यांना वरळी येथून बुधवारी रात्री 'सीबीआय'ने (केंद्रीय तपास संस्था) ताब्यात घेतले. चतुर्वेदी यांचे अपहरण केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला असून बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याबाबत सीबीआयने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

रात्री आठ वाजता हा प्रकार देशमुख यांचे निवासस्थान असलेल्या वरळी येथील शुभदा इमारतीखाली घडला. दहा ते बारा अज्ञात लोकांनी गौरव चतुर्वेदी  आणि त्यांचे वकील यांचे अपहरण केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला. तसेच अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यासाठी देशमुख कुटुंबिय वरळी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते.

मात्र त्यानंतर चतुर्वेदी यांची अटक सीबीआयने केल्याचे स्पष्ट झाले. सुमारे ३० मिनीटांच्या चौकशीनंतर चतुर्वेदी यांना सोडून देण्यात आले. मात्र रात्री उशिरापर्यंत चतुर्वेदी यांच्या वकीलाची चौकशी मात्र सुरु होती. अनिल देशमुख यांची कथित १०० कोटी वसुलीच्या संदर्भात सीबीआय चौकशी करत आहे. दरम्यान देशमुख यांना सीबीआयने 'क्लीन चीट'  दिल्याची कागदपत्रे मध्यंतरी समाज माध्यमांवर आली होती.

ती कागदपत्रे चतुर्वेदी यांनी फोडल्याचा संशय सीबीआयला आहे. त्याबाबत चौकशी करण्यासाठी चतुर्वेदी यांना ताब्यात घेतल्याचे समजते. कोणतीही नोटीस न देता अटक करणे बेकायदेशीर असून याबाबत सीबीआयने खुलासा करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

देशमुख यांची हाॅटेल, शिक्षण संस्था, निवासस्थाने यावर सीबीआयने छापे घातले होते. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय स्वतंत्रपणे चौकशी करत आहे. ईडीने देशमुख यांची साडेचार कोटीची मालमत्ता जप्त केली आहे.