तिन्ही कृषि कायदे रद्द झालेच पाहिजे- राष्ट्रवादी

मुंबई
 03 Jul 2021  244

*तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत ही पक्षाची स्पष्ट भूमिका;मात्र काही माध्यमातून उलटसुलट बातम्या करुन लोकांची दिशाभूल करण्यात येतेय - नवाब मलिक 


लोकदूत वेबटीम 

मुंबई ३ जुलै

 

केंद्रसरकारच्या तिन्ही कृषी कायद्याबाबत पवारसाहेबांनी सल्ला दिलेला नाही. तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत ही पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. मात्र काही माध्यमातून उलटसुलट बातम्या करुन लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 

 
केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्याला महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचा कालपण विरोध होता... आजपण आहे आणि उद्यापण राहिल अशी स्पष्ट भूमिकाही नवाब मलिक यांनी सांगितली. 


विधानसभेत याविरोधात प्रस्ताव पारित करण्याचे सरकारकडून काम होणार आहे. त्या कायदयाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. ही समिती सर्व गोष्टींचा अभ्यास करेल त्यानंतर ती समिती शेतकऱ्यांच्या नेत्यांशी बोलेल.नंतर मसुदा तयार करुन पुढे कसं जायचं. शेतकऱ्यांना तो मसुदा मंजूर होणार नाही तोपर्यंत सरकार पुढे जाणार नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. 
पवारसाहेबांनी पत्रकारांना केंद्र सरकारमधील हालचालींची याबाबतीत माहिती दिली होती. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्याचे स्वागत केले म्हणजे तिन्ही कृषी कायद्याबाबत पवारसाहेबांनी सल्ला दिला असा होत नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले. 
आमच्या सरकारचा व आमच्या पक्षाचा सुरुवातीपासून आजपर्यंत तिन्ही कृषी कायदयाला कायम विरोध राहिलेला आहे हे पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले आहे.