भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

महाराष्ट्र
 17 Oct 2021  206

आघाडी सरकार जाते की राहते गौण 

- राज्यातल्या विरोधकांनी सक्षमपणे काम करावे

लोकदूत वेबटीम 
मुंबई 17 ऑक्टोबर 


राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार चालते की पडते, हे आमच्यासाठी महत्वाचे नाही. विरोधकांनी जनतेसाठी काम करणे महत्वाचे, असा सल्ला देत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वपक्षाला देत रविवारी (ता.१७) घरचा आहेर दिला.

पंकजा मुंडे या आज सकाळी प्रसार माध्यमांशी मुंबई विमानतळावर बोलत होत्या. दिल्ली दौऱ्याबाबत त्यांना विचारले असता, 'पक्षाच्या सचिवांची दिल्लीत पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे. त्यासाठी आपण दिल्लीला चाललो आहोत, असे त्यांनी सांगितले.

सरकार पडणार आहे, असे सारखे आम्ही विरोधक म्हणू लागलो तर कार्यकर्त्यांत चुकीचा संदेश जाईल. परिणामी कार्यकर्ते सक्रीय राहणार नाहीत, असा दावा मुंडे यांनी केला. तसेच विरोधक म्हणून आमचे काम सक्षमपणे चालले आहे, असे त्यांनी सांगितले.

पंकजा मुंडे बीडच्या पालकमंत्री असताना न्याय मिळाला नाही, असा आरोप आहे. यावर उत्तर देताना, हे जनताच ठरवेल असे त्यांनी म्हटले. तसेच उस्मानाबाद, मराठवाडा दौऱ्यात फडणवीसांसोबत तुम्ही नव्हता, असे विचारले असता, “तेव्हा माझी तब्येत बरी नव्हती. देवेंद्र फडणवीसांनाही ते माहिती आहे.  जिथे मला निमंत्रण असते तिथे माझी उपस्थिती असते,” असे त्यांनी सांगितले.

भगवानगडावरील दसरा मेळाव्यात पंकजा यांनी सरकार पडणार की नाही या भूमिकेतून बाहेर पडा, असा सल्ला सहकाऱ्यांना दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत विचारले असता त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करण्याएवढ्या त्या मोठ्या नेत्या नाहीत असे म्हटले होते.

त्यावर पंकजा म्हणाल्या, मी पवार साहेबांचे वक्तव्य मोबाइलवर पाहिले. मी मोठी नेता नाही, हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोलले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, शिकवले पाहिजे, त्यांच्या बोलण्याने आपण लहानही होत नाही आणि मोठ्याही होत नाही, अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.