शेतकऱ्यांनी भाजपला नाकारले - पायलट

महाराष्ट्र
 04 Oct 2021  195


-माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांचा दावा

-मुंबईत गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचे आंदोलन

 

 लोकदूत वेबटीम 

मुंबई 4 ऑक्टोबर 

कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवलेल्या भाजपाला देशतील शेतकऱ्यांनी नाकारले आहे. शेतकऱ्यांवर भाजप कार्यकर्ते करत असलेले हल्ले गंभीर असून उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी आंदोलनातील हिंसेची न्यायीक चौकशी करावी, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री व राजस्थानचे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केली.


पायलट यांनी सोमवारी आझाद मैदानातील गांधी भवन येथे प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, शेतकरी आंदोलन दाबवण्याचा केंद्र सरकार व भाजपा प्रयत्न करत असून त्यात त्यांना यश येणार नाही. हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर हे शेतकऱ्यांच्या विरोधात भाजपा कार्यर्त्यांना लाठी उचला, असे सांगत आहेत. हा प्रकार देशातील लोकशाहीची मुळे उखडण्याचा प्रकार आहे, असा आरोप पायलट यांनी केला.


उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील  शेतकरी आंदोलनातील पिडीतांच्या कुटुंबियास काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी भेटण्यास जात होत्या. त्यांना उत्तर प्रदेश सरकारने बेकायदेशीर रित्या स्थानबद्ध केले. एखादा नेता पिडितांना भेटण्यास जाण्याने कायदा व सुव्यवस्था कशी काय अडचणीत येऊ शकते, असा सवालही पायलट यांनी केला.


गुजरातमध्ये २१ हजार कोटींचे अंमली पदार्थ एका कंपनीने आयात केले  होते. मात्र त्याची माहिती गुजरात सरकार दडपून ठेवत असून या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी पायलट यांनी केली. देशात ड्रग्ज रुट बनवला जात आहे, असा आरोप पायलट यांनी केला.


साडेसात वर्षात सर्वच आघाड्यावर केंद्रातील माेदी सरकार साफ अपयश ठरले आहे. विद्यार्थी, शेतकरी, मध्यमवर्ग, युवक, व्यापारी सर्वजण त्रस्त आहेत. मात्र केंद्राच्या विरोधातील लढाई ही राजनैतिक मार्गानीच लढली पाहिजे, अहिंसेच्या मार्गाने केंद्र सरकारला प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे पायलट यांनी आवाहन केले. 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या लखीमपुर येथील हिंसाचारात बळी गेलेल्या शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील तालीबानी राज असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सोमवारी राज्यभर आंदोलन केले. मुंबईत नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले.