कुलगुरू निवडीचे अधिकार राज्य सरकारकडे

विधिमंडळ
 29 Dec 2021  449

कुलगुरु निवडीचे अधिकार आले सरकारकडे

महाराष्ट्र सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहात गोंधळात मंजूर
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री झाले आता सर्व विद्यापीठांचे थेट बाॅस
लोकदूत वेबटीम 

मुंबई 28 डिसेंबर 


सरकार आणि विरोधकांना आमने-सामने आणणारे आणि राज्यपालांचे अधिकार कमी करणारे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (तिसरी सुधारणा) विधेयक 2021 अखेर मंगळवारी  गोंधळात मंजूर करण्यात आले.  राज्य सरकारच्या या विधेयकामुळे आता राज्यपालांचे अधिकार कमी होणार असून राज्यातील विद्यापीठांवर आता थेट अंकुश सरकारचा असणार आहे.

आजच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत विद्यापीठ सुधारणा विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. राज्यपालांचे अधिकार कमी करण्याबद्दलच्या या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा सुरु झाली. विद्यापीठ सुधारणा विधेयक संयुक्त समितीकडे सहा महिन्यासाठी विचारार्थ पाठवण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांच्या या मागणीला सत्ताधाऱ्यांनी विरोध केला.

या विधेयकावर आजच चर्चा करून विधेयक संमत करण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर दिला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज उशीरापर्यंत चालले. शेवटी या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये मतभेद होऊन सभागृहात गोंधळ झाला. या गोंधळातच शेवटी विद्यापीठ सुधारणा विधेयक मंजुर करण्यात आले.

हे विधेयक गोंधळात मंजूर केल्याचा आरोप करत महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या  इतिहासातील हा सर्वात काळा दिवस असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीसांनी केला. हे सरकार चर्चेपासून पळत असून हे पळपूटे आणि बेशरम सरकार असल्याचाही आरोप त्यांनी आरोप केला.
मात्र सरकारने मंजूर केलेल्या या विधेयकास राज्यपाल मंजुरी देणार का, याविषयी मात्र सरकारला मोठी भिती आहे.
--------------------------------------------------------
आम्ही या विद्यापीठ सुधारणा विधेयकास न्यायालयात आव्हान देणार आहोत, तसेच राज्यातील सर्व विद्यापीठात आंदोलन करणार आहाेत.
-देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.
------------------------------------------------