राज्यपाल -मुख्यमंत्र्यांत संघर्षाची ठिणगी

विधिमंडळ
 27 Dec 2021  438

विधिमंडळ कायदे तुमच्या कक्षेत येत नाहीत 


उद्धव ठाकरेंचे राज्यपालांना खरमरीत उत्तर 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 27 डिसेंबर 


विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक  घेण्यावरुन सरकार विरुद्ध राज्यपाल या संघर्षात  स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उतरल्यामुळे हा संघर्ष आता जास्तच पेटला आहे. उद्धव ठाकरे यांनी  राज्यपालांना खरमरीत पत्र लिहीत विधिमंडळ कायदे तुमच्या  अधिकार कक्षेत येत नाहीत, असे राज्यपालांना  ठणकावले आहे.   
   त्याचवेळी राज्यपालांच्या विरोधानंतरही महाविकास आघाडीने अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याची रणनीती आखल्याने व पत्रात मुख्यमंत्र्यांनी पत्रात तसे स्पष्ट संकेत दिल्याने हा संघर्ष वेगळ्या वळणावर पोहोचला आहे. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षांची  निवडणूक घेण्यास मान्यता नाकारल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे खरमरीत पत्र लिहिले आहे. 
  या पत्रात निवडणूक घेण्याबाबत सरकार ठाम असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. कायदे मंडळाने काय कायदे केले, ते तपासण्याचा अधिकार राज्यपाल म्हणून तुम्हाला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. राज्यपाल महोदयांनी अभ्यासात अनावश्यक वेळ घालवू नये, कायदेशीर आहे की नाही हे तपासण्याच्या उद्योगात पडू नये. आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना सुनावले आहे.  विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत सरकार आग्रही असून अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी देखील या पत्रातून मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या पत्रावर राज्यपाल काय निर्णय घेतात याबाबत आता उत्सुकता आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय राजकीय घडामोडी होणार आहेत.