देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारला धरले धारेवर

विधिमंडळ
 23 Dec 2021  409


राज्य सरकारचे अस्तित्वच जाणवत नाही

* विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हल्लाबोल

* पेपर फुटीचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत 

लोकदूत वेबटीम

मुंबई 23 डिसेंबर 

राज्यात जनतेचे मोठ्या प्रमाणात प्रश्न वाढले असून एकंदरीत भयानवह अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.एकाकीकडे परीक्षा घेणारेच पेपर विकत असून शासकीय रुग्णालयात अग्नीतांडव घडत आहे.मात्र या सर्व परिस्थितीत राज्य सरकारचे अस्तित्वच जाणवत नसल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केला. विरोधी पक्षाच्या 293 अन्वये प्रस्ताव उपस्थित करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसरकारला धारेवर धरले. 

     विधानसभेत उपस्थित प्रस्तावावर बोलतांना विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारच्या एकूण कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्यात एकीकडे दंगली घडवल्या जात आहे. मात्र शासनाची यावर थातूर मातूर उत्तरे पाहून याबाबत राज्य सरकार भूमिकाच घेत असल्याचा आरोपही यावेळी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केला. म्हाडा, आरोग्य विभाग, टीईटी या तीनही परीक्षांचे पेपर फुटले आहेत. या पेपरफुटीच्या घोटाळ्यांचे लागेबाधे थेट मंत्रालयापर्यंत जोडले गेले आहेत. ज्या कंपन्या अपात्र आणि काळ्या यादीत टाकण्यात आल्या होत्या, त्या कंपन्यांना परीक्षा घेण्याची कंत्राटे देण्यात आली. टीईटी घोटाळ्यात तर मंत्र्यांच्या आजूबाजूचेच काही लोक सामील आहेत. त्यामुळे पुणे पोलीस सद्या चांगला तपास करीत असले तरी त्यांचे हात लवकरच बांधले जाणार आहेत. त्यामुळे या सर्व पेपरफुटीच्या घोटाळ्यांची एकत्रितरीत्य सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची इशाराही त्यांनी दिला. विविध नोकरभरतीत उघडकीस आलेले घोटाळे, त्यात झालेल्या अटकेच्या कारवाया आदी महत्वाच्या बाबीवर  सभागृहात वाचा फोडली

 नागरिकांचे प्रश्न वाढत असून विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा बांधावर जाऊन करणाऱ्या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात सेवा देणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची परिस्थिती नीट न हाताळल्याने दोन महिन्यांपासून कर्मचारी आंदोलन करीत असल्याचेही सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

     राज्यात नोकरभरती प्रक्रिया आणि परीक्षांचा खेळखंडोबा झाला आहे. कुंपनच शेत खात आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यासाठी चार कंपन्या पात्र ठरल्या आणि न्यासा नकवाची एक कंपनी अपात्र ठरली होती. नंतर या अपात्र कंपनीलाच काम देण्यामागे काय कारण होते? असा सवाल फडणवीस यांनी विचारला. आरोग्य खात्याच्या सहसंचालकांनी प्रश्नपत्रिका फोडली. त्यातून कोट्यवधीची कमाई केली. म्हाडाच्या नोकरभरतीसाठी जीए टेक्नॉलॉजी नावाची काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला काम देण्यात आले. टीईटी परीक्षा घोटाळ्याचे कनेक्शन तर थेट मंत्र्यांच्या जवळच्या लोकांपर्यंत आहे. या घोटाळ्याशी बड्या लोकांचा असलेला सबंध पहाता पोलीस खोलवर जाऊन तपास करू शकणार नाहीत, त्यामुळे सीबीआय चौकशी करावी, असा आग्रह फडणवीस यांनी धरला. 

चौकट 1

महाविकास आघाडीकडून मराठवाडा, विदर्भावर अन्याय

मराठवाडा आणि विदर्भाची हक्काची वैधानिक विकास महामंडळे रद्द करून राज्य सरकारने या विभागातील लोकांची कवच कुंडले काढून घेतली आहेत. वैधानिक विकास महामंडळांचा मुडदा पडल्याने राज्यपालांना निर्देश देण्याचे अधिकार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे मराठवाडा व विदर्भाच्या हक्काचा निधी पळविला जात आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्त्वाच्या योजना बासनात गुंडाळण्यात आल्या आहेत. या योजना बंद करण्याऐवजी त्या स्लो पॉईझन देऊन मारण्याची सरकारची रणनीती आहे, या विभागांसाठी बोलणारेही सरकारमध्ये कोणी नाही, असा हल्ला फडणवीस यांनी चढविला. 


चौकट 2

राज्याची अवस्था पाहून बाळासाहेबांना वेदना होत असतील - फडणवीस

फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या तेजस्वी पुरुषाचे वारसदार आहेत. ते तब्येतीमुळे सभागृहात नसले तरी राज्याची आजची अवस्था पाहून स्वर्गात बाळासाहेबांनाही वेदना होत असतील. राज्यात सरकारचे कुठेही अस्तित्व उरलेले नाही. प्रशासकीय यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. 

कविवर्य कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्य देवीची विनावणी करून राज्यकर्त्यांना कसे वागावे हे सांगितले होते. ही विनवणी मंत्र्यांनी वाचावी आणि कारभार सुधारावा, असा टोला त्यांनी लगावला.