अर्थसंकल्पात राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे उघडा डोळे बघा नीट - अजित पवार*

विधिमंडळ
 13 Mar 2020  641

  लोकदूत वेबटीम 

मुंबई  13 मार्च 

मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र दिसत नाही असे विरोधकांनी सांगितले. पण वास्तविक पाहिले तर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आमच्यावर आहेत. यंदाचे महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. ज्यावेळी आम्ही मंत्रीमंडळाची बैठक घेतो तेव्हा त्यात कोणत्याही भागावर दूजाभाव होणार नाही याची काळजी घेतो. त्यामुळे हा आरोप कदापी मान्य करणार नाही. विदर्भच नाही तर कारवार, निपाणीसारख्या भागाचा देखील विचार आम्ही केला आहे. यासाठी उघड्या डोळ्यांनी अर्थसंकल्प पाहण्याची गरज आहे. इतकेच नाही तर राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी उघडा डोळे बघा नीट असा सल्ला उपमुख्यमंत्री तथा वित मंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना दिला.अर्थसंकल्पावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात विरोधकांना चिमटे काढत तर कधी सल्ले देत आणि मध्येच कोपरखळ्या करत विरोधी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

विधानसभेत ५९ सदस्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा केली या सदस्यांचे आभार अजित पवार यांनी मानले. विरोधक टीका करणार सत्ताधारी नेते याची स्तुती करणार हे आजवर चालत आले आहे. दोन्ही बाजूच्या प्रतिक्रियेचा आदर करतो असेही अजित पवार म्हणाले.कुठलाही अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर त्याच्या सकारात्मक बातम्या पत्रकारांकडून दिल्या गेल्या. यासाठी अनेक दाखले दाखवता येईल. देशात मंदी आहे हे सर्व जनतेला माहीत आहे तरी ही सकारात्मक प्रवाह अर्थसंकल्पातून पाहिला गेला आहे.मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ येथील नेत्यांची बैठक घेऊन तिथल्या कापसाला न्याय देऊन बळीराजाला मदत कशी मिळेल अशी आमची भूमिका आहे. या चर्चेतून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विश्वास देतो की, हे सरकार तुमचे आहे यातून कुठलीही अडचण तुमच्यावर येवू देणार नाही असा शब्द अजित पवार यांनी दिला.

                        प्रत्येकाच्या हक्काचे पैसे मागील सरकारने कमी केले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पैसे कमी केले आहेत. मात्र आम्ही अर्थसंकल्पात अन्याय केलेला नाही. दुसऱ्याच्या तोंडातील घास आम्ही काढून घेतला नाही असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.नागपूर पाणी प्रश्नासाठी निधीची तरतूद करुन देणार आहे. शिवाय मुंबई हेरिटेजसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी दिला आहेत. मी पुण्याचा पालकमंत्री आहे म्हणून जास्त पैसे घेतले नाही की दिले नाहीत. हे सांगताना भाजप सरकारने कसा आकड्यांचा खेळ केला याचे आकडेवारीसह मांडणी केली आणि महाविकास आघाडी सरकारने कुणावर अन्याय केला नाही हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मराठवाडयासाठी वॉटर ग्रीड साठी प्रयत्न करणार आहे. आता २०० कोटी रुपये दिले आहेत. ही सुरुवात आहे. जो काही निधी देणार आहे तो कमी पडणार नाहीच हा शब्द आहे. त्यामुळे मराठवाडयासाठी महाविकास आघाडीचे सरकार निधी कमी पडू देणार नाही असेही अजित पवार यांनी सांगितले.
               सार्वजनिक बांधकामासाठी ९ टक्के वाढ केली आहे. जलसंपदा १० हजार कोटींची तरतुद केली आहे. शिवाय वंचित समाजाला न्याय देण्याचा आमचा विचार आहे. जास्तीत जास्त निधी अधिक देण्याचा प्रयत्न केला आहे. आणि डोंगरी तालुक्याला २ कोटीचा निधी दिला आहे. त्यामुळे वर्षाला ५ कोटी रुपये डोंगरी विभागातील आमदारांना मिळणार आहेत.विरोधक विकास कामांना स्थगिती दिली अशी ओरड करत आहेत. मात्र मागील पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारचे १६०० कोटीपैकी ११०० कोटींची स्थगिती दिली. म्हणजे त्यावेळी जसं झालं तसं आताही होतंय हे लक्षात घ्या असेही अजित पवार म्हणाले.यावेळी बोलताना अजित पवार यांनी सुधीर मुनगंटीवार चूक झाली आमची असं जे म्हणाले त्या चुकीला आता माफी नाही असा चिमटाही काढला. त्यावेळी सभागृहात जोरदार हंशा पिकला.अजित पवार बोलत असताना भाजपसोबत गेल्याचा मुद्दा सभागृहात काही सदस्यांनी काढला. त्यावेळी गप्प बसतील ते अजित पवार कसले.... जे मी करतो ते समोर करतो लपून करत नाही असे सांगताना आता इथे मजबुत आहे हे लक्षात घ्या असे खडेबोल सुनावले.शिवभोजन योजनेचा म्हणजेच आमच्या जाहीरनाम्याचा आम्ही अभ्यास केला नाही तेवढा अभ्यास 'या' महाराजांनी केला आहे असा टोला सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाहून अजित पवार यांनी लगावला.लोकभावनेचा विचार करून सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पात न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यावर आर्थिक संकट असतानाही आम्ही सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून अर्थसंकल्प दिला आहे असेही अजित पवार म्हणाले.शेवटी कोरोना व्हायरसबाबत काळजी घेण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. या व्हायरसमुळे परदेशात काही आमदार, खासदारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. लोकांना भेटण्यासाठी कमी बोलवा अशा प्रकारचे जनतेला सांगा असे आवाहनही अजित पवार यांनी केले.