आता आमदारांच्या ड्राइव्हरलाही मिळणार १५ हजार रुपये दरमहा वेतन

विधिमंडळ
 12 Mar 2020  930
आता आमदारांच्या ड्राइव्हरलाही मिळणार १५ हजार रुपये दरमहा वेतन 

# ६ कोटी ६० लाख रुपयांचा वार्षिक आर्थिक अतिरिक्त ताण 

लोकदूत वेबटीम 

मुंबई १२ मार्च 

महराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांच्या विकास निधीत १ कोटी रुपयांची वाढ केली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. त्याच पाठोपाठ आता आमदारांच्या ड्राइव्हरलाही दरमहा १५ हजर रुपयांचे वेतन विधी मंडळामार्फत देण्यात येणार आहे. याबाबत संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत प्रस्ताव मांडला असता,सभागृहाने एकमताने सदर प्रस्ताव मंजूर केला आहे. 

        नुकताच टेबल केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी आमदारांचा विकास निधी दोन कोटी वरून तीन कोटी वर नेला आहे. मागील सरकारने आमदारांच्या पीए चा पगार १५ हजारावरून २५ हजार रुपये केला होता. आता महाविकास आघाडीच्या सरकारने आमदारांच्या ड्रायव्हरला दरमहा १५ हजार रुपये वेतन देण्याचे ठरविले आहे. याबात दोन्ही सभागृहात प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. विधानसभेत एकूण २८९ आमदारांची संख्या असून २८८ आमदार राज्यातून निवडून आलेले आहे. तर एक आमदार अँग्लो इंडियन मधून राज्यपाल नियुक्त करतात. मात्र या सरकराने कुठलाही आमदार अद्याप नियुक्त केला नसल्याने २८८ आमदार विधानसभेतील तर विधानपरिषदेतील ७८ आमदारांच्या ड्राइव्हरला १५ हजार दरमहा वेतन मिळणार आहे. यामुळे राज्य सरकारवर तब्बल ६ कोटी ६० लाख रुपयांचा वार्षिक आर्थिक ताण येणार आहे.