राज्यात शिमगा संपल्याने आता भाजपच्या नेत्यांचे सरकार पाडण्याचे मुहूर्त संपले आहेत

विधिमंडळ
 11 Mar 2020  649
राज्यात शिमगा संपल्याने आता भाजपच्या नेत्यांचे सरकार पाडण्याचे मुहूर्त संपले आहेत : पवार
 
लोकदूत वेबटीम
मुंब ११ मार्च
 
शंभर दिवसांच्या महाराष्ट्र सरकारला शंभर मार्क असे सांगतानाच मध्य प्रदेशात जो प्रयोग झाला तो महाराष्ट्रात कदापी होऊ शकत नाही, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. राज्यात शिमगा संपल्याने आता भाजपच्या नेत्यांचे मुहूर्त संपले आहेत असेही पवार म्हणाले. ठाकरे सरकार उत्तम कामगिरी करत असून इथे भाजपा नेत्यांना कोणतीही संधी नाही अशा शब्दात शरद पवार यांनी महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस यशस्वी होणार नाही हे स्पष्ट केले.
राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल कऱण्यासाठी पवार मुंबईत आले होते. विधानभवनात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की महाराष्ट्रातील सरकराने शंभर दिवस पूर्ण केले आहेत या काळात पत्रकारांना काहीही लिहण्याची संधी मिळाली नाही हेच सरकारच्या यशाचे गमक आहे. हे सरकार योग्य दिशेने योग्य पद्धतीने महाराष्ट्र पुढे येईल असा विश्वास व्यक्त केला.
मध्यप्रदेशाच्या स्थिती संदर्भात पवार म्हणाले की ज्योतिरादित्य शिंदे हे एक चांगले युवा नेतृत्व होते पण त्यांच्या पक्षात काय झाले हे मला माहिती नाही. पण काँग्रेस पक्षात निवडणूक हरलेल्या नेत्याला लगेच काही जबाबदारी दिली जाईल असे होत नसते. तरीही आता असे वाटते की कदाचित शिंदेंच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना पक्षाचे अध्यक्षपद दिले गेले असते तर कदाचित स्थिती निराळी झाली असती. पण कमलनाथ यांना मी ओळखतो. राजकीय चमत्कार करण्याची त्यांची क्षमता नक्कीच आहे हे मी सांगू शकतो. अद्यापी तिथले सरकार कोसळले आहे असे नाही त्यामुळे वाट पाहू या असेही ते म्हणाले.
येस बँक घोटाळ्याच्या जबाबदारी पासून केंद्रीय अर्थखाते व बँकिंग व्यवहार खाते यांना पळ काढता येणार नाही हा घोटाळा काही एका दिवसात नक्कीच घडलेला नाही असेही ते म्हणाले जम्मू व काश्मीरमधील ज्या नेत्यांना स्थानबद्ध केले हे ते कोणत्या कयद्याखाली असा सवाल पवार यांनी केंद्र सरकारला केला. या संवेदनशील राज्यातील महत्वाच्या नेत्यांना तुरुंगात डांबणे हे अधिकाराचा दुरुपयोग आहे असे सांगून पवार म्हणाले, की मी, ममता बॅनर्जी, देवेगौडा, यशवंत सिन्हा अशा पाच सहा लोकांनी पंतप्रधानांना या संदर्भात पत्र लिहिले हे असेही पवार म्हणाले.