मुख्यमंत्री ऍक्शन मोड मध्ये - आदित्य

मुंबई
 23 Jan 2022  206

मुख्यमंत्री लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले स्पष्ट

लोकदूत वेबटीम 

मुंबई 23 जानेवारी 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते लवकरच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसतील. पण विरोधक कितीही खालच्या स्तरावर जाऊ शकतात. हे त्यांच्या आरोपावरुन दिसले आहे, असा दावा करत विरोधक जनतेला भरकटवत असल्याचा आरोप शिवसेना नेते व राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी केला.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मुंबईतील वरळी मतदारसंघातआज विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, विरोधक आरोप-प्रत्यारोप करुन मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करु पाहत आहेत. कालपरवा जो सर्व्हे आला त्यात मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आहेत. मुख्यमंत्री कधीही मैदानात उतरण्यास तयार आहेत, पण आम्हीच ओमायक्रोनमुळे काळजी घेत आहोत. विरोधक कितीही खालच्या स्तराला जाऊ शकतात, हे राज्याने पाहिले आहे.


निवडणुका येत-जात असतात. आम्ही नेहमीच काम करत असतो. कितीही काम केले तरी विरोधक टीका करतातच. त्यांना ही कामे दिसतच नाहीत. तरीही विरोधकांचे माझ्यावर लक्ष आहे, हे पाहून बरं वाटले, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.


झालेल्या कामांवर पालिका निवडणुकीत रेटिंग झालं तर शिवसेना एक नंबर ठरेल. पण आम्ही निवडणूक असताना, नसताना काम करत असतो. अनेक शिवसैनिक तर तिकिटाची इच्छा न बाळगता काम करीत असतात. असे कार्यकर्ते असतील तर जनतेची सेवा २४ तास होत असते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
--------------------
विरोधक राज्यपालांकडे बसलेले असतात
विरोधकांनी राज्यपालांकडे जाऊन केलेल्या सरकार बरखास्तीच्या मागणीबाबत बोलताना आदित्य म्हणाले, विरोधकांना लोक विचारत नाहीत. इतर कुठेही जाऊन बोंबाबोंब करण्याची त्यांना संधी नाही. त्यामुळे ते राज्यपालांकडे जातात आणि निवेदन देतात, असा टोला आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.