कोरोना प्रभाव ; 60 मॅट्रिक टन पर्यंत प्राणवायूची गरज

मुंबई
 05 Jan 2022  225

वैद्यकीय प्राणवायुची मागणी पोचली ६० टनावर

-७०० टन मागणी झाल्यास टाळेबंदीचा होणार निर्णय
-निर्बंधासाठी रुग्णसंख्येचा निकष लावण्याची शक्यता

लोकदूत वेबटीम 

मुंबई 5 जानेवारी 


दैनंदिन ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासेल तेव्हा राज्यात लॉकडाऊन लावला जाईल, असे राज्याचे धोरण आहे. राज्यात सध्या ६५ हजार सक्रिय रुग्ण असून दैनंदिन ५० ते ६० मेट्रिक टन द्रवरुप वैद्यकीय प्राणवायुची आवश्यकता भासत आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत आहे तर दुसरीकडे प्राणवायुची गरज कमी भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार लाॅकडाऊनविषयी काय निर्णय घेणार याकडे सर्वांो डोळे लागले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांना लिक्विड ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासली. मात्र, मागणी व पुरवठा यात मोठी तफावत राहिल्याने  झारखंड, कर्नाटकसह इतर काही राज्यांतून ऑक्सिजन मागवावा लागला होता.

राज्यात दुसऱ्या लाटेदरम्यान १२५० मेट्रीक टन आॅक्सीजनची निर्मिती होती. त्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील ४५० जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांत पीएसए आणि एएसयू प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत २६० हून अधिक पीएसए आणि एएसयू प्लांट उभारले गेले आहेत. राज्यात सध्या २३०० मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे.

पहिल्या लाटेत २० लाख तर दुसऱ्या लाटेत ४० लाख नागरिक कोरोनाने बाधित होते. तिसऱ्या लाटेत ८० लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होईल असा अंदाज आहे. सध्या सक्रीय रुग्णसंख्या ६५ हजाराच्या घरात आहे. पण पुढच्या १५ दिवसात ती वाढण्याचा अंदाज आहे.

राज्यात ६५ हजारांहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील केवळ १८०० रुग्ण ऑक्सिजनवर असून, त्यांना दैनंदिन ५० ते ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. ओमायक्रॉन बाधित रुग्णाला ऑक्सिजनची गरज भासत नाही तसेच हे रुग्ण ५ ते ६ दिवसात बरे होत आहेत.

७०० मेट्रीक टन आॅक्सीजनचे सूत्र तिसऱ्या लाटेत कालबाह्य ठरले आहे. त्यामुळे सरकार आता रुग्णसंख्येचा निकष लावून लाॅकडाऊनची चाचपणी करत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने २० हजार दैनंदिन रुग्णसंख्या आढळल्यास लाॅकडाऊनचा इशारा दिला आहे. रुग्णसंख्येेचे हे सुत्र इतर स्थानिक स्वराज्य संस्था लागू करतील, असा संशय आहे.
-----------
प्राणवायु स्थिती :
१. राज्यात १२० आॅक्सीजन रिफीलर्स असून त्यांच्याकडे ३१३८ मेट्रीक टन टन लिक्वीड आॅक्सीजन साठवणूक क्षमता आहे.
२. रुग्णालयांना रिफीलर्सव्दारे मागच्या आठवड्यात २३२.७१ मेट्रीक टन लिक्वीड आॅक्सीजन पुरवठा करण्यात आला.
३. मागच्या आठवड्यात रुग्णालयांना उत्पादकांव्दारे परस्पर ८८.०५ मेट्रीक टन लिक्वीड आॅक्सीजन पुरवठा करण्यात आला.
४. रुग्णालयांना मागच्या आठवड्यात एकुण 320.76 मेट्रीक टन लिक्वीड आॅक्सीजन पुरवठा करण्यात आला.
---------------------------------