सहकार विभागाचा दणका;प्रवीण दरेकर अध्यक्ष पदाला मुकणार ?

मुंबई
 04 Jan 2022  230

जिल्हा बँक जिंकूनही सभासद म्हणून अपात्र ठरवले

-मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांना सहकार विभागाचा दणका
-मुंबै बँकेचे अध्यक्ष पद आले आहे धोक्यात

लोकदूत वेबटीम 

मुंबई 4 जानेवारी 


मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्थात मुंबै बँक निवडणुकीत 21 पैकी 21 जागा जिंकणाऱ्या प्रवीण दरेकरांना निवडणुकीनंतर लगेचच सहकार विभागाने मोठा दणका दिला. संचालक म्हणून बिनविरोध निवडून गेलेले प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून सहकार विभागाने अपात्र ठरविले आहे. प्रविण दरेकर यांनी विधानसभा निवडणुकीवेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील उत्पन्नासह इतर माहितीवर बोट ठेवत सहकार विभागाने सोमवारी कारवाई केली.

मुंबै बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रविण दरेकर यांच्या मजूर असण्यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यासंदर्भात 'आप'चे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी विधान परिषदेच्या उपसभापतींकडे तक्रार केली होती. तर दुसरीकडे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही या प्रकरणात लक्ष घातलं होतं.

दरम्यान, मुंबै बँक निवडणुकीत प्रविण दरेकर हे मजूर प्रवर्गातून बिनविरोध निवडून आले. त्याचबरोबर त्यांच्या सहकार पॅनेलचाही विजय झाला आहे. असं असतानाच प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर म्हणून अपात्र घोषित केले आहे. विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दरेकर हे मजूर म्हणून अपात्र असल्याचा आदेश काढला आहे.

मजूर व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष अंगमेहनतीचे व शारीरिक श्रमाची कामे करणारी व्यक्ती असून जिथे उपजीविकेचे प्रमुख साधन मजुरीवर अवलंबून असेल. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी आपण उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली व कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता दोन कोटी 13 लाख पाच हजार पाचशे रुपये इतकी दाखविलेली असून, त्यामध्ये आपले स्वत:च्या नावे जंगम मालमत्ता 91 लाख दोन हजार इतकी दाखविलेली आहे.

आपण राज्याच्या विधान परिषदेचे सदस्य म्हणून आपणास अंदाजे अडीच लाख (मानधन व भत्त्यासह) मासिक उत्पन्न होत असल्याचे दिसून येते. त्यावरून प्रथमदर्शनी आपण मजूर असल्याचे दिसून येत नाही. प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्नाचे साधन स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले आहे. त्यात आपण मजुरी करीत असल्याचा कोठेही उल्लेख केल्याचे दिसून येत नाही.

प्रतिज्ञा मजूर संस्थेचे सदस्य म्हणून पुढे चालू राहण्यासाठी आवश्यक असलेली अर्हता आपण धारण करीत नसल्याने आपणास मजूर म्हणून अपात्र घोषित करीत आहे. तसेच संस्थेच्या सदस्यत्वाचा दूर करण्यासाठी मुंबई शहर जिल्हा उपनिबंधकांना प्राधिकृत करीत आहे, असे बाजीराव शिंदे यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे.
---------------------
प्रविण दरेकर हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक आहेत. सहकार विभागाच्या या कारवाईमुळे त्यांचे असलेले मुंबै बँकेचे अध्यक्षपद धोक्यात आल्याचे म्हटले जाते आहे.
------------------------
आपण सहकार विभागाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचा दावा प्रविण दरेकर यांनी आज केला.
----