देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीवर मंत्री नवाब मलिकांची टीका

मुंबई
 21 Dec 2021  215

पेपरफुटीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का?


* राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल
फडणवीस यांच्या मागणीवर टीका

लोकदूत वेबटीम 
 मुंबई 21 डिसेंबर 

सार्वजनिक आरोग्य, म्हाडाच्या  भरती परीक्षेच्या  पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे चौकशीला  देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? असे सवाल करत  राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंगळवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीवर टीका केली.
म्हाडा, आरोग्य  विभागाच्या पेपरफुटीची प्रकरण समोर आल्यानंतर  परीक्षा आयोजन करणाऱ्या कंपन्यांची चौकशी  सुरु केली आहे. राज्य सरकारने या कंपन्यांना काळ्या यादीत टाकून  पुढील कोणतीही कामे न  देण्याचा  निर्णय घेतला आहे. या तपासाचे धागेदोरे नागपूरपर्यंत पोहोचले असल्याचे सानाग्त  व्यापम घोटाळ्यातील लोक यात सहभागी असल्याची शंका मलिक यांनी  उपस्थित केली.
आधीच्या सरकारने या कंपन्यांचे एक पॅनेल तयार केले होते. यातून अनेक परीक्षा घेण्यात आल्या. कौस्तुभ धावसे  नावाच्या  दलालाने या कंपन्यांना पोसण्याचे काम केले. याचा तपास सुरु असून २०१८ मधील काही गोष्टीही समोर आल्याचे मलिक  यांनी सांगितले. या कंपन्यांनी ज्या परीक्षा घेतल्या आहेत त्याचा सखोल तपास करुन दोषींवरकारवाई होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मराठी संस्था बंद करण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने मागे घ्यावा
दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न प्रलंबित असताना आता कर्नाटक सरकारने मराठी संस्थावर  बंदी आणण्याचा  प्रस्ताव विधानसभेत मांडला असून हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी यावेळी केली.
कर्नाटकात मराठी भाषिक नागरिकांवर अन्याय होत आहे. हा अन्याय मर्यादेपलीकडे जात आहे. भाषेवर प्रेम करणारे लोक देशभर असतात. कर्नाटक राज्यात मराठी भाषा आणि महाराष्ट्राला विरोध होत असताना आता  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबनाही करण्यात आली. या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री ही छोटी-मोठी घटना असल्याचे म्हणतात. मात्र छत्रपती शिवाजी महाराज ही देशाची अस्मिता आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आपले वक्तव्य मागे घेऊन  तत्काळ माफी मागावी,  अशी मागणीही त्यांनी केली.
...........................