राहुल गांधींची मुंबईतील सभा रद्द

मुंबई
 14 Dec 2021  201


* ओमायक्राॅनच्या सावटामुळे पालिका- पोलिसांनी नाकारली परवानगी 


लोकदूत वेबटीम 

मुंबई 14 डिसेंबर 

काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांची मुंबई येथे २८ डिसेंबर रोजी होणारी शिवाजी पार्कवरील सभा पुढे ढकलण्यात आली आहे. ओमायक्रॉनच्या संकटामुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली. तसेच, नव्या तारखा लवकरच जाहीर करु, असे देखील भाई जगताप यांनी मंगळवारी  सांगितले.

काँग्रेसचा येत्या २८ डिसेंबरला वर्धापन दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची मुंबईत शिवाजी पार्कवर जाहीर सभा आयोजित केली होती. मात्र, ओमायक्रॉनमुळे या सभेला मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यामुळे मुंबई काँग्रेस यांनी मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी धाव घेतली. मात्र, मंगळवारी परवानगी मागणीची याचिका मागे घेतली. 

या सगळ्या घडामोडीनंतर भाई जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांची मुंबई होणारी सभा ओमायक्रॉनच्या संकटामुळे पुढे ढकलली आहे, अशी माहिती दिली. राज्य सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत. त्याचं पालन करतच काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा केला जाईल. हा कार्यक्रम तेजपाल ऑडिटोरियममध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली. आम्ही १५ दिवसांपासून राज्य सरकारकडे सभेसाठी मागणी करत होतो. पण आम्हाला उत्तर आले नाही. त्यामुळे आम्ही न्यायालयात गेलो, असे भाईंनी सांगितले. तसंच पुढील मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नवी तारीख जाहीर झाल्यावर शिवाजी पार्कातच राहुल गांधी यांचा मेळावा होईल, असे भाई जगताप यांनी सांगितलं.

राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी असली तरी मुंबई महानगरपालिकेत बिघाडी आहे. तथापि, शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर काँग्रेस-सेनेची वाढती जवळीक वाढली आहे.

----