संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई

मुंबई
 14 Dec 2021  201

२३० एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटीसा

-महामंडळाने कठोर कारवाईचा बडगा उगारला

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 14 डिसेंबर 

राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी शेवटची संधी (अल्टिमेटम) देऊन बहुतांश कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर आज मंगळवार पासून  बडतर्फीची कारवाई सुरु झाली आहे. आज पहिल्याच दिवशी २३० कर्मचाऱ्यांना बडतर्फीच्या नोटीसा दिल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी दापोली येथे प्रसिद्धी माध्यमांना दिली.


8 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी  काम बंद आंदोलन सुरु केले. वेतनवाढ आणि विलीनीकरण या दोन प्रमुख मागण्यांवर कर्मचारी ठाम होते. सरकारने 24 नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा निर्णय जाहीर केला. तरी संप चालुच आहे. महामंडळाने आजपर्यंत 10 हजार 180 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून रोजंदारीवरील 2 हजार 29 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली आहे. तसेच २ हजार २५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

मंगळवारी एसटीचे २१ हजार ६४४ कर्मचारी कामावर होते. संपात अजूनही ६७ हजार ९०४ कर्मचारी सहभागी आहेत. आज २५० पैकी १२२ आगार चालु होते. तर २ हजार ५१९ एसटी फेऱ्या चालवण्यात आल्या.

बडतर्फीची प्रक्रिया :

कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आजपासून कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्या जात आहेत. या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देण्यासाठी सात किंवा पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो. त्यानंतर तीन सुनावणी होतात त्यात जर दोषी आढळले तर बडतर्फीची नोटीस दिली जाते. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुन्हा सात दिवसांचा कालावधी दिला जातो  आणि त्यानंतर बडतर्फीची कारवाई केली जाते.