ना. मुश्रिफ कुटुंबियांवर 127 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

महाराष्ट्र
 13 Sep 2021  213

मंत्री मुश्रीफ कुटुंबियांचा १२७ कोटींचा घोटाळा

-मुश्रीफांच्या कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यावधींची कर्जे

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 13 सप्टेंबर 


राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी नेते हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मनी लाँडरिंग, बेनामी व्यवहारांद्वारे १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते माजी खासदार डॉ. किरीट सोमैय्या यांनी सोमवारी केला. याबाबत सोमैय्या यांनी हसन मुश्रीफ, मुश्रीफ यांच्या पत्नी आणि त्यांचे पुत्र नावेद यांच्याविरुद्ध आयकर अधिकाऱ्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली.

पत्रकार परिषदेत सोमैय्या यांनी सांगितले की, मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांचे कोलकाता येथील शेल (कागदोपत्री) कंपन्यांशी व्यवहार झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून उत्पन्न मिळाल्याचे मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यांतील व्यवहारांवरून दिसून आल्याचा दावा सोमय्या यांनी केला.

नावेद मुश्रीफ यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक लढविताना आपल्या उत्पन्नाबाबत दाखल केलेल्या शपथपत्रात अनेक संशयास्पद कंपन्यांबरोबर त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचे दिसून येते आहे. नावेद हे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे भागधारक असल्याचे दिसते आहे. या साखर कारखान्याने अनेक मनी लाँडरिंग व्यवहार (पैशाची अफरातफर ) केल्याचे कागदपत्रांवरून दिसून आले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला.

नावेद यांनी सीआरएम सिस्टीम या कंपनीकडून २ कोटींचे तर मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स या कंपनीकडून ३.८५ कोटींचे कर्ज घेतले. या दोन्ही कंपन्या कोलकाता येथील असून यांचे संचालक असलेले सिकंदर देसाई, आलमगीर मुजावर, गोपाळ पवार हे मुश्रीफ यांचे जवळचे कार्यकर्ते आहेत. श्रीमती सहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावावर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे ३ लाख ७८ हजार ३४० शेअर्स आहेत. २००३ ते २०१४ या काळात हसन मुश्रीफ हे राज्यात कॅबिनेट मंत्री होते. या काळात घोरपडे साखर कारखान्याला शेल कंपन्यांकडून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.

मुश्रीफ यांनी स्थापन केलेल्या संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावावर मरुभूमी फायनान्स कडून १५. ९० कोटी, नेक्स्टजेन  कन्सल्टन्सी कडून ३५. ६२ कोटी, युनिव्हर्सल ट्रेंडीं एलएलपी कडून ४.४९ कोटी, नवरत्न असोसिएट्स कडून ४. ८९ कोटी, रजत कन्झ्युमर सर्व्हिसेस कडून ११.८५ कोटी, माऊंट कॅपिटल कडून २. ८९ कोटी अशा रकमा जमा झाल्याची माहिती यावेळी सोमय्या यांनी दिली.
-------------
१. ग्रामविकास मंत्री यांच्या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आपल्याकडे असून उद्या मी हे सर्व पुरावे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात सादर करून अधिकृत तक्रार देणार आहे. तसेच परवा दिल्लीला जाऊन अर्थ मंत्रालय आणि तेथील ईडीकडे मी हे सर्व पुरावे सादर करणार आहे, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
------
२. किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या मंत्री व नेते अशा ११ जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामध्ये अनिल परब, मिलिंद नार्वेकर, अनिल देशमुख यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या आणखी एका मंत्र्याचा आपण लवकरच घोटाळा बाहेर काढणार आहोत, असे सोमय्या यांनी आज सांगितले.
------------------