ओबीसीच्या उमेदवारांनाच उमेदवारी

महाराष्ट्र
 08 Sep 2021  214

-भाजपप्रमाणे राष्ट्रवादी  काँग्रेसचा निर्णय
-केंद्राच्या विरोधात आंदोलने करा: शरद पवार यांचे आदेश


लोकदूत वेबटीम 

मुंबई 8 सप्टेंबर 
पुढच्या वर्षी होणाऱ्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापूर्वी इतर मागास वर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. मात्र तो न सुटल्यास आणि निवडणुका लागल्यास ओबीसींच्या मतदारासंघात ओबीसी उमेदवार दिला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना आश्वास्त केले.

मंत्रालयासमोरी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बुधवारी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, मंत्री व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पक्षाच्या उमेदवारांची बैठक झाली, त्यात पवार मार्गदर्शन करताना बोलत होते.

पवार यांनी यावेळी आमदार व नेत्यांना लोकांत जाण्याची सूचना केली. कोविडचा काळ आहे, जनतेच्या अनेकविध समस्या आहेत, त्यांच्याशी समरस व्हा. ओबीसी आरक्षण प्रश्नी तोडगा काढण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. ओबीसी आरक्षणप्रश्न मार्गी लागेपर्यंत निवडणुका नको, अशी पक्षाची भूमिका आहे. मात्र आरक्षणविना निवडणुक लागली तर आरक्षण बाधीत झालेल्या ६ जिल्ह्यांत ओबींसींच्या २७ टक्के जागांवर ओबीसी उमेदवार दिला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.  

'आपले आघाडी सरकार आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आघाडी, युती होईलच असे निश्चित आता सांगता येत नाही. स्थानिक परस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. उर्वरित जिल्ह्यात लवकरच संपर्कमंत्री नेमले जातील. पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात दौरे काढावेत आणि स्थानिक प्रश्न मार्गी लावावेत', अशी सूचना शरद पवार यांनी बैठकीत केली.

केंद्र सरकारने अनेक अन्यायकारी निर्णयाचा सपाटा लावला आहे. महागाई, इंधन दरवाढ असे सामान्यांच्या जगण्याशी निगडीत अनेक प्रश्न आज उग्र झाले आहेत. त्यांवर राष्ट्रवादीने आंदोलने करावीत, जनतेसाठी आवाज उठवा, मात्र कोविडचे भान बाळगून सर्व करा, असे पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.  
----
दुसऱ्या लाटेत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे मुंबईच्या प्रदेश कार्यालयातील जनता दरबार बंद पडले. गणेशोत्सवानंतर ते पुन्हा चालु करा. तसेच त्या त्या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तर संपर्कमंत्र्यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जनता दरबार घ्यावेत, असे आदेश शरद पवार यांनी दिले.