साहेब तुम्हीच सांगा.....पवारांसमोर स्वपक्षाच्या नेत्यांनी मांडली व्यथा

महाराष्ट्र
 08 Sep 2021  198

-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी शरद पवारांना केला सवाल
-काँग्रेस, शिवसेनेचे मंत्री कामे करत नसल्याचा आरोप

लोकदूत वेबटीम 

मुंबई 8 सप्टेंबर 

मविआ मधील मित्रपक्षाचे पालकमंत्री आमच्या कामांना करतो म्हणून सांगतात.मात्र आमचे कामच केले जात नाही. त्यामुळे साहेब तुम्हीच सांगा ? मतदारसंघ कसा बांधायचा आणि  पक्ष कसा वाढवायचा, असा सवाल मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच विचारला.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, मंत्री व खासदार यांचेसह मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची प्रदीर्घ बैठक बुधवारी  पार पडली. त्यात बहुतांश उमेदवारांनी काँग्रेस -शिवसेनेचे पालकमंत्री कामे करत नसल्याबाबत तक्रार केली.

सदर बैठकीला मागील विधानसभा निवडणुकीतील सर्व ११४ उमेदवार उपस्थित होते. सकाळी ९ वाजता सुरु झालेली बैठक दुपारी २ पयंंत चालली. या बैठकीत ५५ उमेदवारांना बोलण्याची संधी मिळाली. प्रत्येकाने आपल्या मतदारसंघातील परस्थिती यावेळी सांगतिली.

विहिरीत पाणी आहे, पण वीज जोड मिळत नाही, राेहीत्र दुरुस्त करुन मिळत नाही, अशा तक्रारी अनेक आमदारांनी सांगितल्या. अापल्या मतदारसंघात मंजूर झालेले कोविड सेंटर दुसरीकडे नेल्याचे आरोप काही उमेदवारांनी केले. अनेक जिल्ह्यांना संपर्क मंत्री नाहीत, त्यामुळे कामांचा पाठपुरावा करण्यात अडचण येत असल्याचे अनेकांनी सांगतिले.

या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या तक्रारीचा सर्व रोख हा काँग्रेस आणि शिवसेनेचे मंत्री व पालकमंत्री यांच्याकडे होता. मतदारसंघात घड्याळाला वातावरण चांगले आहे, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आघाडी झाल्यास कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळणार नसल्याचे अनेकांनी सांगितले. चार सदस्यीय प्रभाग पद्धती बदलण्याची काहींनी मागणी केली.

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न नाही सुटला तर निवडणूक जड जाईल, असे काही उमेदवार म्हणाले. शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप केला. 'आपले आघाडी सरकार आहे, त्यामुळे कामे मार्गी लागण्यास अडचणी नक्की आहेत. मात्र त्यावर तिन्ही पक्षांचे नेते बसून मार्ग काढतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.