टास्क फोर्समधील डॉक्टरांचे जनतेला आवाहन

महाराष्ट्र
 05 Sep 2021  217

उपचार करण्यापेक्षा होऊ नये यासाठी दक्ष राहा


-कृती दलातील डाॅक्टरांचा वैद्यकीय परिषदेत सल्ला

-डबल मास्क हा कोरोना लढाईतली ढाल आहे

-म्युकरमायकोसीस निदानासाठी एमआरआय करा

-रोज मास्क बदला, ओला मास्क घालू नका

-कोविडपश्चात जीवनशैली योग्य ठेवा

लोकदूत वेबटीम 

मुंबई 5 सप्टेंबर 

कोरोना होऊन उपचार करण्यापेक्षा संसर्ग होऊच नये यासाठी पुरेशी दक्षता घेण्याचा सल्ला रविवारी ‘माझा डॉक्टर’ वैद्यकीय परिषदेत तज्ज्ञांनी दिला. कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संबोधनाने उद्घाटन झाले. त्यात वैद्यकीय तज्ञांनी आपली निरिक्षणे नोंदवली.


कोरोना संपला असे वाटायला लागले म्हणून अनेक लोक मास्क वापरत नाहीत. सण, उत्सव, विवाह, पार्टी सोहळे मोठ्या संख्येने करत आहेत.  विषाणूमध्ये बदल होत असून डेल्टाचा फैलाव वेगाने होतो आहे. डेल्टानंतर कोलंबियामध्ये नवा स्ट्रेन आढळून आला आहे. अशी माहिती हाॅवर्ड विद्यापीठाचे तज्ञ मेहुल मेहता यांनी दिली.


कोविडची विविध लक्षणे आढळत असून काही रुग्णांना चव आणि वास येत नाही. पोटरीचे स्नायू आणि पाटदुखी वाढली, डायरिया, उलटी होण्याचे लक्षणे दिसत आहेत. त्रास झाला किंवा कोणतीही लक्षणे दिसली तर ‘कोविड नाही ना?’ हा प्रश्न प्रत्येक डॉक्टर्सने आणि सुजाण नागरिकाने आपल्या मनाला विचारावा असा सल्ला कोरोना कृती दलाचे अध्यक्ष संजय ओक यांनी दिला.


स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरिया, लॅप्टो आदी आजारांची लक्षणे एकसारखीच असून एनएसवनएनएसटू बरोबरच मलेरिया, लॅप्टोच्या चाचण्यांसह कोविडसाठी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. म्युकरमायकोसिसच्या निदानासाठी सिटी स्कॅनपेक्षा एमआरआय करणे आवश्यक असल्याचे डॉ. ओक म्हणाले.


कोरोनाच्या या पहिल्या, दुसऱ्या लाटेत आपल्याला हर्ड आणि हायब्रीड इम्युनिटी पहायला मिळाली. कोविडची लक्षणे आढळली चाचणी करा. ऑक्सिजन दर, नाडीचे ठोके, ताप, आदींच्या नोंदी करा. ज्यांच्या संपर्कात आलात त्यांनाही चाचणी करायला सांगा. तसेच मास्क हा प्रत्येक स्ट्रेनवर प्रभावी असून दुहेरी मास्क संरक्षणासाठी मजबूत ढाल असल्याचेही डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.


नव्या लक्षणांकडे लक्ष ठेवतानाच हाय रिस्क फॅक्टरमधील रुग्णांना जपणे गरजेचे आहे. रोज मास्क बदला आणि ओला झालेला मास्क कधीही लावू नका, अशा सूचना देतानाच कोविडचे लक्षणे दिसली की वेळेत चाचण्या करण्याचे आवाहन डाॅ. राहुल पंडित यांनी केले. ऑक्सिजनचे प्रमाण ९३ पेक्षा कमी झाले असेल तर पोटावर झोपण्याने निश्चितच चांगले परिणाम बघायला मिळतात, असे पंडित म्हणाले.


कोविड पश्चात लक्षणे ४ ते १२ आठवडे असतात. ही केवळ गंभीर रुग्णांमध्येच नाहीत तर साधारण आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांमध्ये सुद्धा  दिसतात. कोविड लक्षणांच्या काळात ईसीजीमध्ये अथवा टूडी इको मध्ये काही आढळल्यास त्यावर उपचार करणे खूप आवश्यक असते. असा सल्ला देऊन कोविड पश्चात जीवनशैली चांगली ठेवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. अजित देसाई यांनी केले.


ज्या मुलांमध्ये संक्रमण झाले तर त्याची तीव्रता सर्वसाधारणपणे सौम्य असते, त्यांच्यावर घरीही उपचार करू शकतो. गंभीर लक्षणे असे सांगून या आजारामुळे मुलांना मानसिक त्रास होऊ नये याकरिता त्यांच्याशी संवाद साधणे अधिक गरजेचे आहे, असे बालकांसाठीच्या राज्य कृतीदलाचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनी स्पष्ट केले. तसेच आईला जर कोविड असेल तर नवजात शिशुची आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे असल्याचेही डाॅ. प्रभू यांनी सांगितले.