कोरोनाच्या तिसऱ्या लातेसंदर्भात जनतेने ठरवावे

महाराष्ट्र
 05 Sep 2021  205


-मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांचा जनतेला गंभीर इशारा

-दुसरी लाट गणेशोत्सवानंतर आल्याची दिली आठवण

-'माझा डाॅक्टर' परिषदेत कोविड उपाययोजनांचा घेतला आढावा

लोकदूत वेबटीम 

मुंबई 5 सप्टेंबर 

 

गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी खुल्या केल्या असून दुसरी लाट गणेशोत्सवानंतरच आली होती. यावर्षी रुग्णसंख्या आत्ता वाढतांना दिसत असून गर्दी होणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना करत नागरिकांनी तिसरी लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला दिला.


कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या उपाययोजनांबाबत आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन वैद्यकीय परिषदेचे मुख्यमंत्री बोलत होते. या परिषदेस आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, राज्य कोविड कृतीदलाचे सदस्य तसेच राज्यातील डॉक्टर्स, नागरिक सहभागी होते.


मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, नाही ना? याचा विचार करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचे होते पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या जीवाशी खेळू नका, असे सांगत आंदोलन करायचे तर ते कोरोनाविरुद्ध करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.


तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धचे जर हे युद्ध आहे, असे आपण मानतो तर आपली शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे. डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमनदल कर्मचारी सगळेच कोरोना योद्धे आहेत. त्यामुळे सर्व रुग्णालयांनी उपययोजनांचे ऑडिट करून घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.


राज्याचे ऑक्सिजनचे उत्पादन दररोज १२०० ते १३०० मे.टन असून ही गरज मागच्यावेळी १७०० ते १८०० मे.टन एवढी वाढली होती. इतर राज्यातून हजारो कि.मी. वरुन ऑक्सिजन आणावा लागला होता. पण त्या राज्यात रुग्णसंख्या वाढल्यास आपल्याला तेथून ऑक्सिजन मिळत नाही, अशावेळी आपल्या ऑक्सिजनच्या क्षमतेतच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पावसाळा सुरु आहे. कोविड नसला तरी डेंग्यु, मलेरियाच्या रुग्णांची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही जशी महत्त्वाची गोष्ट आहे तशीच ‘माझे गाव माझी जबाबदारी’ ही गोष्ट ही महत्त्वाची असून गाव कोरोनामुक्त करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

अशी आहे तयारी :

1. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये राज्यात साडेचारशेपेक्षा अधिक ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात आले आहेत.

२. औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यासाठी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि हाफकिनला सूचना दिल्या आहेत.

३.  कोविड चाचण्यांची क्षमता प्रतिदिन आरटीपीसीआर दोन लाख तर एक लाख अँटिजेन आहे. चाचण्यांसठी ४१० शासकीय आणि २०२ खाजगी प्रयोगशाळा आहेत.

४. कोविड रुग्णांसाठी ४ लाख ८० हजार रुग्ण खाटा वाढविण्यात आल्या आहेत. त्यात १ लाख २० हजार ऑक्सिजनयुक्त, ३६ हजार आयसीयू आणि १४ हजार व्हेंटिलेटर्स खाटा आहेत.