एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सुटणार

महाराष्ट्र
 02 Sep 2021  212

एसटी महामंडळाला 500 कोटी वितरित


-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशाने कार्यवाही

-राजकीय हस्तक्षेप संपवल्याशिवाय मंडळाला उभारी अवघड

लोकदूत वेबटीम

मुंबई 2 सप्टेंबर 

राज्यभरातील कानाकोपऱ्यात आपली सेवा बजावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला सध्या आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनासाठी 500 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर हा निधी गुरुवारी तातडीने वितरित करण्यात आला. निधी वितरित झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच महामंडळाचे आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी 1450 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी 838 कोटी रुपयांचा निधी एसटीला आधीच वितरित केला असून उर्वरीत 612 कोटींपैकी 500 कोटी रुपये तातडीने एसटी महामंडळाला देण्यात यावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर आज तातडीने हा निधी वितरित करण्यात आला.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असून महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती काम करत आहे. समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार येणाऱ्या काळात कार्यवाही करण्यात येणार आहे.


कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे एसटीची वाहतूक मंदावली होती. त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या तिकीट महसूलावर झाला आहे. प्रवासी संख्या रोडावल्याने अपेक्षित उत्पन्न मिळेनासे झाले आहे. पुर्ण क्षमतेने एसटीची वाहतूक सुरु असली तरी प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही.


त्यातच इंधनाचे वाढते दर, टायर व वाहनांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती याचा विपरित परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होत आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवने देखील एसटीला शक्य होत नाही.  

-------------

कोरोना काळात आर्थिक उत्पन्नाचा फटका बसलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासनाने गुरुवारी ५०० कोटी रूपयांची आर्थिक मदत दिली. या निर्णयामुळे एसटीच्या ९३ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जुलै २०२१ या महिन्याचा रखडलेल्या वेतनाचा प्रश्न सुटणार आहे.