महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्र
 01 Sep 2021  223

* १२ आमदार नियुक्तीचा योग्य निर्णय करतो

लोकदूत वेबटीम 

मुंबई 1 सप्टेंबर 

महाविकास आघाडीचे राज्यात सरकार अस्तित्वात आल्यापासून राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात नेहमीच खटके उडालेले राज्याने बघितले आहे. मात्र बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  यांनी बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या बैठकीत  गेल्या ९ महिन्यांपासून रखडलेल्या विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांच्या नियुक्त्या मंजूर करावी, अशी विनंती केली. राज्यपाल यावर काय निर्णय घेतात, याविषी उत्सुकता आहे.

 बुधवारी रात्री ७.३० वाजता राजभवनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गेले, त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे हाेते. आघाडी सरकारचे शिष्टमंडळ राजभवनवर सुमारे तासभर होते. भेट संपल्यावर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या भेटीचा तपशिल देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यपाल महोदय यांना आम्ही राज्यातील परस्थितीची माहिती दिली. खान्देशात झालेला मोेठा पाऊस, झालेले नुकसान आणि राज्यातील धरणांची स्थिती याबाबत माहिती दिली.

विधानपरिषेदच्या जागा रिक्त राहिल्याने सभागृहा चालवण्यात अनेक अडचणी येतात. विधान परिषदेवर पाठवायच्या १२ सदस्यांच्या शिफारशी करुन मोठा कालखंड झाला आहे. त्यामुळे या नियुक्त्या लवकर मार्गी लावा, अशी विनंती राज्यपाल यांना केल्याचे पवार म्हणाले.
राज्यपाल महोदय यांनी आमचे म्हणणे एेकुन घेतले. त्यांना काही प्रश्न होते, त्याबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच १२ सदस्यांच्या रखडलेल्या नियुक्त्याबाबत मी योग्य निर्णय करतो, असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगतिले.


नामनिर्देशित १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यास राज्यपालांनी अवाजवी विलंब केला आहे, असे मध्यतंरी मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेले आहे. मात्र न्यायालयाच्या टिपण्णीविषयी आम्ही राज्यपाल यांच्याशी काहीही बोलणे झाले नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

----------

12 सदस्य कोण?

-काँग्रेस: 1) सचिन सावंत, 2) रजनी पाटील, 3) मुजफ्फर हुसैन, 4)अनिरुद्ध वनकर.

-राष्ट्रवादी काँग्रेस : 1) एकनाथ खडसे, 2) राजू शेट्टी 3) यशपाल भिंगे, 4) आनंद शिंदे.

-शिवसेना : 1) उर्मिला मातोंडकर, 2) नितीन बानगुडे पाटील, 3) विजय करंजकर, 4) चंद्रकांत रघुवंशी.