काम न करताच निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार

विधिमंडळ
 13 Mar 2020  694


# अजित पवार यांची विधानसभेत घोषणा 

 लोकदूत वेबटीम 

मुंबई  13 मार्च   

काम न करता शासकीय तिजोरीतून निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी  विधानसभेत केली.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कृषी विभागाच्या शेडनेट पॉलिहाऊस नाला खोलीकरण व रुंदीकरण कामांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करण्यात आला होता असा तारांकित प्रश्न अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील आणि शहाजी बापू पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. अधिकाऱ्यांनी काम न करताच पैसे काढल्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी विधानसभेत मान्य केले. तसेच जत तालुक्यातील या प्रकरणी संबंधित तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांच्याकडून सुमारे दहा लाख रुपये वसूल करुन घेण्यात आले आहेत. तसेच कृषी आयुक्तांमार्फत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आले आहे, असे यावेळी मंत्री भुमरे यांनी सांगितले. त्यावर हा सरकारच्या तिजोरीवर दरोडा आहे असे सांगत, याप्रकरणी कडक कारवाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला दिले. त्यावर या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून बडतर्फीची कारवाई केली जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.