नियमबाह्य पध्दतीने सभागृहाचे कामकाज

विधिमंडळ
 05 Mar 2020  652

नियमबाह्य पध्दतीने सभागृहाचे कामकाज

 कामकाज दिवसभरासाठी गुंडाळाले*

*विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा आरोप*

तभा वृत्तसेवा 

मुंबई ५ मार्च 

 विधानपरिषदेत विरोधकांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यात होत आहे. सभागृहात सादर करण्यात आलेल्या महिलांच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रबोधनाचे भाषण झाल्यानंतर उपसभापतींनी अन्य कोणत्याही सदस्याला बोलण्याची परवानगी नाकारली. नियमबाह्य पध्दतीने चालणा-या सभागृहाच्या कामकाजामुळे विरोधक आक्रमक झाले व त्यांनी गदरोळ केला व घोषणाबाजी केली. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अखेर उपसभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी गुंडाळाले असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केला. 

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यांसदर्भात पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षांची भूमिका मांडताना सांगितले की, महिला दिनाचे औचित्य साधत सभापतींनी महिलाच्या विषयांचा प्रस्ताव मांडला. विरोधी पक्ष नेत्यांनी या प्रस्तावाचे स्वागत करुन आपला मुद्दा मांडला. परंतु उपसभापतींनी यांसदर्भात सभागृहात कौटुंबिक हिंसाचाराच्या व छळाच्या घटनेसंदर्भात विरोधकांची मागणी फेटाळली, त्यामुळे विरोधकांनी गदारोळ घातला व सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर विरोधकांना सामंज्यसाची भूमिका घेत महिलांच्या प्रस्तावावर चर्चेची तयारी दर्शविली. प्रथम मनिषा कायंदे, स्मिता वाघ आदी सदस्यांनी आपली मते मांडली. भाजपचे प्रसाद लाड आपली भूमिका मांडतांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सभागृहात आले. लष्करी सेवेत दाखल झालेल्या लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचे अभिनंदन करणारा ठराव मांडण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी सभागृहात उपस्थित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावर बोलण्यास सुरुवात केली. त्यांनीही लाड यांच्या भूमिकचे स्वागत केले.  प्रबोधनकार ठाकरे यांचा वारसा चालविणा-या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रबोधनकात्मक भाषण केले व विचार मांडले. पण त्यानंतर मात्र उपसभापतींनी हा प्रस्ताव संपल्याचे जाहिर केले व पुढील कामकाज पुकारले अशी माहिती दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपसभापतींच्या या कृतीला प्रविण दरेकर यांनी जोरदार आक्षेप घेतला. प्रस्तावावर चर्चा सुरु असताना अचानक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. त्यावेळी या प्रस्तावावर चर्चा होणे शिल्लक होते. दोन्ही बाजूंच्या अनेक सदस्यांना आपली मते मांडायची होती. पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर उपसभापतींनी प्रस्ताव संपल्याचे जाहिर केले. उपसभापतींच्या या कृतीचा निषेध केल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, सभागृहातील अन्य सदस्यांना बोलायचे असताना उपसभापतींनी ही चर्चा कशी काय गुंडाळली. तसेच हे कामकाज कोणत्या नियमाने केले अशी विचारणा केली. पण उपसभापतींनी काहीही उत्तर दिले नाही, त्यामुळे विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज १० मिनिटांकरिता तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विरोधकांनी आपला मुद्दा लावून धरला. सभागृहात अश्या कामकाजामुळे चुकीची प्रथा पडत आहे. विरोधकांना बोलू दिले जात नसल्यामुळे या मुद्दयावर विरोधक अतिशय आक्रमक झाले. त्यामुळे उपसभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी गुंडाळले असा आरोपही दरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.