अर्थसंकल्पाचे पोकळ भाषण करुण शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.

विधिमंडळ
 06 Mar 2020  650


अर्थसंकल्पाचे पोकळ भाषण करून अर्थमंत्र्यांचे शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले ! - देवेंद्र फडणवीस


लोकदूत वेबटीम

मुंबई ६ मार्च 

- महाविकास आघाडी शासनाने विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हे केवळ पोकळ भाषण आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्या भाषणात कोणतीही आकडेवारी नव्हती. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचे विश्‍लेषण नव्हते. नवीन वर्षात काय अपेक्षित आहे, किती तूट राहील किंवा अधिक्य राहील, अशा कोणत्याही गोष्टी या अर्थसंकल्पात नाहीत. अर्थसंकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसते भाषण करून त्यांनी शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ६ मार्च या दिवशी विधानभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, अर्थसंकल्प समतोल नाही. महाराष्ट्र शासनाला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे राज्यात येतात याचा विसर पडला आहे. मराठवाडा ‘वॉटर ग्रीड’ हा २० सहस्र कोटी रुपयांचा प्रकल्प आहे; पण या शासनाकडून केवळ २०० कोटी देण्यात आले आहेत. कोकणातील वाहून जाणारे १६८ टीएम्सी पाणी गोदावरी खोर्‍यांत आणून मराठवाडा दुष्काळ मुक्त करायची आमची योजना होती; पण त्याचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात केलेला नाही.
अर्थसंकल्पात ओपनिंग, क्लोजिंग बॅलेन्स किती असेल ? किती तूट राहील ? यातील कोणतीही गोष्ट नव्हती. या अर्थसंकल्पामुळे तूट वाढणार असून त्यामध्ये कोणतेही संतुलन नाही. या शासनाला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा विसर पडला आहे. कोकणाचे नाव घेतले असले, तरी कोकणाच्या तोंडालाही पान पुसण्यात आली आहेत.  शासनाने कर्जमाफी घोषित केली, तरी मुदत कर्जासंबंधी कोणतीही नवीन घोषणा केलेली नाही. दोन लाख रुपयांच्यावर कर्ज असलेल्या शेतकर्‍यांसाठी ५० सहस्र रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार आहे. आम्ही दीड लाख रुपयांच्यावर कर्ज असलेल्या शेतकर्‍यांसाठी अशाच प्रकारची घोषणा केली. त्या वेळी आमच्यावर प्रचंड टीका करण्यात आली; पण आता हीच घोषणा शासनाने केली आहे, असे फडणवीस म्हणाले.
अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना एक नवा पैसा सरकारने अर्थसंकल्पातून दिला नाही. महिला, युवक, शेतकरी आदी घटकांसाठी नवीन योजना नाहीत. मंदीची भीती दाखवून केवळ अपयश लपवण्याचा प्रयत्न या शासनाने केला आहे. पेट्रोल-डिझेलमध्ये १ रुपयांची दरवाढ केल्याने त्याचा परिणाम इतर वस्तू विक्री आणि माल वाहतुकीवर होईल. सभागृहात मांडलेला अर्थसंकल्प हा केवळ ‘२ जिल्ह्यांचा’ आहे, अशी त्यांनी टीका केली.
 
राज्याचा अर्थसंकल्प हा भ्रमाचा भोपळा आहे ! - भाजप नेते सुधीर मुनगंटीवार


विधानसभेत अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा केंद्र शासनाने पाठवलेले निवेदन आहे. १० सहस्र कोटी रुपयांचे अनुदान वाढवून दिल्याविषयी राज्य शासनाने केंद्र शासनाने धन्यवाद मानले नाहीत. हा ‘गजनी’ सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात समान, किमान कार्यक्रमाचे एकही सूत्र दिसत नाही. राज्यातील २ कोटी बेरोजगारांना ५ सहस रुपयांचा भत्ता मिळणार नाही. आम्ही गेल्यावर्षी २ सहस्र ८२ कोटी रुपयांची तूट अर्थसंकल्पात दाखवली होती; मात्र या शासनाची ३१ सहस्र ४४३ कोटी रुपयांची तूट दिसून येते. राज्य शासन एकीकडे तंबाखूवरील बंदी हटवून दुसरीकडे मद्यावरील बंदी उठवत आहे, हा शासनाचा विरोधाभास आहे.