सिडकोचा घोटाळा हिमनगाचे टोक; मास्टरमाईंड कोण ते उघड झाले पाहिजे !

विधिमंडळ
 04 Mar 2020  645

सिडकोचा घोटाळा हिमनगाचे टोक; मास्टरमाईंड कोण ते उघड झाले पाहिजे !: सचिन सावंत.

टेंडरच्या माध्यमातून फडणवीस सरकारने जनतेचा पैसा लुबाडला.

लोकंदूत वेबटीम

मुंबई 4 मार्च

सिडकोच्या कामात प्रचंड अनागोंदी व अनियमितता असून मोठा भ्रष्टाचार झाल्याचे कॅगच्या आजच्या अहवालातून सिद्ध झाले आहे. फडणवीस सरकारने टेंडरच्या माध्यमातून जनतेचा पैसा लुबाडला असून स्वच्छ व पारदर्शक कारभाराचा ठेंभा मिरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारचा बुरखा या अहवालामुळे टराटरा फाडलेला आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सावंत पुढे म्हणाले की, सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ व इतर अशा २००० कोटी रुपयांच्या कामांमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून घोटाळा कारण्यात आला आहे. सिडकोचे काम थेट मुख्यमंत्री कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली होत असताना एवढा मोठा घोटाळा झालाच कसा आणि त्याचा मास्टर माइंड कोण आहे तेही आता समोर आले पाहिजे. कामाचा अनुभव नसलेल्या कंत्राटदाराला ८९० कोटींची कामे दिली गेली. सिडकोचा कंत्राटदारच सिडकोचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो, हे आम्ही सरकारला विचारले होते त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त कामाच्या निविदा राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती न देतात काढण्यात आल्या. तर ४३० कोटी रुपयांच्या १० कामांमध्ये मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. हे गंभीर असून सिडकोमधील हा घोटाळा हिमनगाचे एक टोक आहे..

काँग्रेस पक्षाने फडणवीस सरकारमधील २० मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे दिले होते, परंतु एकाही प्रकरणाची चौकशी न करताच फडणवीस यांनी सर्वांना क्लिनचिट देऊन टाकल्या. पारदर्शी सरकारचा आव आणण्याच्या नादात राज्यातील जनतेची घोर फसवणूक करुन जनतेचा पैसा लूबाडण्यात आला हे आता स्पष्ट झाले आहे. यातील दोषींना आता शिक्षा होण्याची गरज आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे.