विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विधिमंडळ
 26 Feb 2020  636

शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधक दुसऱ्या दिवशीही आक्रमक
विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

लोकदूत वेबटीम 
मुंबई 25 फेब्रुवारी 

भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला अत्याचाराविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे विधानसभेचे कामकाज मंगळवारी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. यावेळी विरोधकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत येऊन गोंधळ घातला. 

अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे दिलेले वचन पाळा, शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. तसेच शेतकरी कर्जमाफीची जाहीर करण्यात आलेली यादी फसवी असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांचा सातबारा कधी कोरा करणार हे सरकारने सांगावे, अशी विचारणाही त्यांनी केली. यावेळी शेतकरी कर्जमाफीवरुन विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता. या स्थगन प्रस्तावावर विचार सुरू असून प्रश्नोत्तरांचा तास चालू द्यावा, अशी विनंती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी विरोधक आमदार करत होते. तसेच विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेमध्ये येऊन सरकारविरोधात घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे आधी दोनवेळा आणि नंतर दिवसभरासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. त्याआधी महिला सुरक्षेच्या मुद्यावरही विरोधकांनी स्थगन प्रस्ताव मांडला, पण प्रचंड गोंधळातही सरकारने कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. 

दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानभवनाच्या आवारात पत्रकारांशी बोलताना केली. सरकारने गाजावाजा करुन कर्जमाफी केली. मात्र दोन महिन्यात केवळ 15 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली. महिन्याला केवळ साडेसात हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विक्रम या सरकारने केला. अशा वेगाने 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी 400 महिने लागतील असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. ज्या गावात शेतकरी कर्जमाफीच्या याद्या जाहीर झाल्या, त्या गावातील 35 टक्केही शेतकरी कर्जमाफीत येत नाहीत. सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल आणि फसवणूक होत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. सरकार ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत आमचा पवित्रा कायम राहील, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला. शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सभागृहात आणि सभागृहाबाहेर आमचा संघर्ष चालूच राहील. संध्याकाळी 6 वाजता आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत. कोल्हापूर जिल्ह्यातील 50 हजार शेतकऱ्यांनी फसव्या कर्जमाफीविरोधात पत्रे लिहिली आहेत. ती पत्रे राज्यपालांकडे सोपवणार आहोत. शेतकऱ्यांची कशी फसवणूक होतेय, ते राज्यपालांना सांगणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.