शेतकऱ्यांचा सातबारा अद्याप कोरा का नाही ? - दरेकर

विधिमंडळ
 26 Feb 2020  644


*शेतक-यांचा सात बारा कोरा अदयापही झालाच नाही*
*-विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची टीका*
*गदारोळानंतर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब*

लोकदूत वेबटीम 
मुंबई दि. २५ फेब्रुवारी

 

शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी दिले होते, परंतु शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला नाही. तसेच शेतकरी अजूनही कर्जमुक्त व चिंतामुक्त झालेला नाही. त्यामुळे सरकार फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात केली. विरोधी पक्ष नेत्यांच्या टीकेनंतर सभागृहात गदोराळ झाला. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी वेलममध्ये येऊन सरकारच्या विरोधात घोषणा सुरु केल्यानंतर सभापतींनी सभागृहाचे कामकाज आधी दोन वेळा अर्ध्या तासासाठी व नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 
सकाळी विधानपरिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर सभापतींनी विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी बोलण्याची परवानगी मागितली. त्यावेळी बोलताना दरेकर यांनी शेतक-यांचा सात बोरा कोरा करण्याची आग्रही मागणी केली. सरकारने घोषित केलेली कर्जमाफीची योजना फसवी आहे. प्रत्यक्षात शेतक-यांना या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत व बागायती शेतीसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदतीची मागणी करणारे महाविकास आघाडीचे सरकार आता सत्तेवर आले आहे, मग त्या घोषणांचे काय झाले असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.  
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पण यावरही सरकार ठोस पाऊले उचलत नाही. हे सरकार जनतेचे प्रश्न समजून घेण्यास संवेदनाहीन असल्यामुळे या सरकारचा निषेध करत असल्याची ठाम भूमिका प्रविण दरेकर यांनी सभागृहात मांडली. त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरु केली. शेतक-यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे...शेतक-यांना न्याय द्या...कर्जमुक्तीच्या घोषणाचे काय झाले त्याचे उत्तर द्या या विरोधकांच्या घोषणा सुरुच होत्या. या गदारोळात विधानपरिषदेचे सभापती राम राजे निंबाळकर यांनी प्रथम दोन वेळा करिता आणि त्यानंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. 
त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, शेतकऱ्यांना देण्यात आलेली कर्जमाफी फसवी आहे. यामुळे विधानपरिषदेमध्ये विरोधकांनी घोषणाबाजी केली. महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांना केवळ मूर्ख बनविण्याचे काम केले.  असा आरोपही आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.