बोगस पुराव्यासाठी परमबीर यांनी दिली लाच - नवाब मलिक

मंत्रालय
 08 Sep 2021  488

-परमबीर सिंग यांनी ५ लाख लाच दिल्याचा सायबर तज्ञांचा जबाब
-अँटालिया स्फोटप्रकरणी 'जैश-उल-हिंद'वर ठेवायचा होता आरोप
प्रतिनिधी । मुंबई
अँटिलिया स्फोटक प्रकरणातील अहवालात जैश-उल-हिंद संघटनेचं नाव  घुसवण्यासाठी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सायबर तज्ज्ञाला ५ लाख रुपये लाच दिली होती, असा धक्कादायक दावा एनआयएच्या (राष्ट्रीय तपास संस्था) आरोपपत्रात करण्यात आला आहे. एनआयएने अँटिलिया स्फोटक प्रकरणी १० हजार पानांचे आरोपपत्र बुधवारी दाखल केले. त्यात या सायबर तज्ज्ञाचा जबाब नोंदवण्यात आला आहे.  

जानेवारी महिन्यात दिल्लीतील इस्त्रायली दुतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला होता. याची जबाबदारी जैश-उल-हिंद संघटनेने घेतली होती. त्याचा फायदा घेत परमबीर सिंह यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटक प्रकरणात जैश-उल-हिंद संघटनेचे नाव घुसवण्यासाठी लाच दिली.

दिल्लीतल्या इस्राईल एम्बसीसमोर झालेला ब्लास्ट दहशतवादी संघटनेशी जोडला गेला आणि त्याची पाळेमुळे तिहार जेलमध्ये सापडली होती. तसे करण्यासाठी परमबीर सिंह यांनी या सायबर तज्ज्ञाला विश्वासात घेतले. यासंदर्भात मी एनआयएच्या आयजींशीही बोलणार आहे असे त्यांनी खोटे सांगितले.

यासाठी त्या तज्ज्ञाला परमबीर यांनी त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. तिथे त्याने बसून अहवालात बदल केला, असे सायबर तज्ज्ञाने त्याच्या जबाबात म्हटले आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस अडचणी वाढत आहेत.

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वसुलीच्या आरोपांची चौकशी करणार्‍या चांदीवाल आयोगाने वसुलीचा आरोप करणार्‍या परमबीर सिंह यांच्याविरोधात ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.
-----------------------------------
-तरी अभय का?
परमबीर सिंग यांनी लाच देऊन स्फोट प्रकरणी बोगस पुरावे बनवेल. मग, एनआयएच्या चार्जशीटमध्ये परमबीर सिंग यांना का वगळले, असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यासाठी परमबीर सिंग यांना एनआयएने अँटालिया स्फोटप्रकरणी कारवाईतून वगळण्याचे आश्वास्त केले होते, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.