सीबीआय अधिकाऱ्यांनी घेतली गृह विभागाच्या अमुस यांची भेट

मंत्रालय
 01 Oct 2021  452

सीबीआय अधिकारी पोचले मंत्रालयात

लोकदूत वेबटीम 

मुंबई 1 ऑक्टोबर 


 सीबीआयच्या एका महिला अधिका-याने शुक्रवारी संध्याकाळी मंत्रालयात येऊन गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची घेतलेली भेट तर दुसरीकडे  माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या संदर्भात आजच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बोलावलेली बैठक या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  परमबीर सिंह यांच्या संदर्भातील हालचालींना वेग आला असून आता त्यांचे  निलंबन निश्चित मानले जात आहे.

राज्याच्या गृह विभागाने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात लूक आऊट नोटीस बजावली आहे. माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणा-या चांदिवाल आयोगाने परमबीर सिंह यांच्या विरुध्द वाँरंट काढला आहे. हे अटक वाँरंट बजावण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी तीन ठिकाणी जाऊन आले पण ते सापडले नाही.  परमबीर सिंह  देश सोडून परदेशात गेल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

या सर्वाच्या पार्श्वभूमीवर सीबीआयच्या एका महिला अधिका-याने अतिरिक्त मुख्य सचिव(गृह) मनुकुमार श्रीवास्तव यांची संध्याकाळी मंत्रालयात येऊन भेट घेतली. या दोघांमध्ये एक तासांहून अधिक चर्चा झाली. ही भेट नक्की कशासाठी होती याची माहिती मिळू शकली नाही. पण परमबीर सिंह प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याने मंत्रालयात चर्चा सुरु झाली.

दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रालयात वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक बोलावली होती. त्यामुळे या प्रकरणात घडामोडींनी प्रचंड वेग आल्याचे सांगण्यात येते. गृहमंत्रालयाने परमबीर सिंह यांच्या विरोधात मागील महिन्यात लूकआऊट नोटीस बजावली आहे. राज्याच्या गृह विभागाने केंद्रीय गृह मंत्रालयाकडून परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा शोधून काढण्यासाठी अधिकृतपणे संपर्क साधला आहे. त्यांना निलंबित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु केल्याचे सांगण्यात येते. परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी कायदेशीर पातळीवर ही केस अत्यंत भक्कमपणे तयार करण्याची प्रक्रीया गृह विभागाने सुरु केली आहे असे समजते.
---///
नाना पटोल यांचा केंद्रावर हल्ला
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी परमबीर सिंह यांच्या प्रकरणावरून केंद्रातील भाजप सरकारवर आज पुन्हा हल्ला केला. ते म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यानुसार परमबीर सिंह हे विदेशात गेल्याची केंद्रीय तपास यंत्रणांनीच माहिती दिली आहे. त्यांचे शेवटचे लोकेशन अहमदाबादमध्ये असल्याचे केंद्रीय यंत्रणांनीच सांगितले आहे. केंद्र सरकारची पाळेमुळे अहमदाबाद व गुजरातमध्ये आहेत. भाजप जेव्हापासून केंद्रात सत्तेवर आहे तेव्हापासून आयएएस व आयपीएस अधिका-यांचा वापर करून केंद्राच्या विरोधातील सरकार ज्या राज्यात आहेत. त्या राज्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केंद्राच्या माध्यमातून सुरु असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.
.......................................................................