परमबीर सिंग देशाबाहेर ,राज्य सरकारला संशय ?

मंत्रालय
 01 Oct 2021  455

 

-केंद्राने पळून जाण्यास मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप
-29 आॅगस्टपासूून राज्य सरकारच्या संपर्कात नाहीत

लोकदूत वेबटीम

मुंबई 1 ऑक्टोबर 


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे अटकेच्या भीतीने देश सोडून  पळाल्याचा संशय एनआयए, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए तपास करत असून परमबीर यांच्यावर महाराष्ट्रात विविध पोलीस स्टेशनमध्ये अॅट्राॅसीटी व खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत.

निलंबीत पोलीस उपनिरिक्षक सचिन वाझेच्या अटकेनंतर परमबीर एकदा एनआयए ऑफिसला आले होते. दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगाने परमबीर यांना अनेकदा समन्स पाठवले आहे. परंतु ते समन्सही सिंग यांना मिळालेले नाही.

अँटालिया स्फोट प्रकरणी परमबीर यांची १७ मार्च रोजी बदली झाली. होमगार्ड महासंचालक पदाचा त्यांनी २२ मार्चला पदभार स्वीकारला. ४ मे पासून ते रुजू होणार होते. मात्र त्यांनी वैद्यकीय रजा टाकली. वेळोवेळी रजा त्यांनी वाढवून घेतली. अलिकडेच त्यांनी २९ आॅगस्टपर्यंत रजा वाढवून घेतली होती.

अनिल देशमुख यांच्यावर परमबीर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी चांदीवाल आयोग करत आहे. या आयोगाने चार वेळा परमबीर यांना समन्स पाठवली आहेत. अटक वाॅरंटही काढलेले आहे. चंदीगढ, रोहतक व मुंबईतील घरी त्यांना संपर्क करण्यात तपास यंत्रणांनाी प्रयत्न केला. सध्या त्यांचा मोबाईल बंद आहे.

एनआयएने दाखल केलेल्या अँटेलिया स्फोटक प्रकरणाच्या आरोपपत्रात परमबीर यांच्यावर आरोप नाही. मात्र विविध पाच गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस त्यांना कधीही अटक करण्याची शक्यता आहे. त्या भितीने परमबीर युरोपातील देशात लपले असावेत, असा कयास वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा तपास यंत्रणांना मिळालेला नाही.
--------