10,12 वीचे वेळापत्रक जाहिर

मंत्रालय
 21 Jan 2021  542

दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, २३ एपिलला बारावीची तर दहावीची २९ पासून लेखी परीक्षा

लोकदूत वेबटीम 

मुंबई 21 जानेवारी 


कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव राज्यात कमी होत असतानाच आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (varsha gayakwad)यांनी राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा या एप्रिल महिन्यात आयोजित करण्यात येत असल्याची आज मंत्रालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत घोषणा केली.  
राज्य शिक्षण मंडळाची दहावीची लेखी परीक्षा ही २९ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत घेतली जाणार असून हा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ही २३ एप्रिल  ते २९ मे  या कालावधीत घेतली जाणार असून बारावीच्या परीक्षेचा निकाल हा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवडयात जाहीर केला जाणार असल्याची माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली.
या परीक्षा घेताना राज्यातील स्थानिक स्तरावरील माहिती घेऊनच त्यासाठीचे नियोजन केले जाणार असून कोवीड आणि त्यासंदर्भातील सर्व खबरदारी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या परीक्षांच्या कालावधीत एखादा विद्यार्थी क्वारंटाईन अथवा कोवीडमुळे परीक्षेला मुकला तर त्याच्या फेरपरीक्षेसंदर्भातही निर्णय घेतला जाईल  अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. 
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळासोबत इतर केंद्रीय शिक्षण मंडळांनी आपल्या दहावी-बारावीच्या परीक्षांची वेळापत्रक आणि त्यांचे नियोजन जाहीर केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा आणि त्याचे वेळापत्रक कधी जाहीर केले जाईल, याकडे लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. 
दहावीच्या लेखी परीक्षांपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा या ९  ते २८ एप्रिल या दरम्यान तर बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा या  १ ते २२ एप्रिल दरम्यान  घेतल्या जाणार असल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली. 
--
राज्यभरातील शाळांत ७६ टक्के उपस्थिती
राज्यातील शाळा या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये  आज राज्यात २१ हजार २८७ शाळा सुरू झाल्या असून यात २१ लाख ६६ हजार ५६ विद्यार्थी नियमित शिक्षण आहेत. तर या शाळांमध्ये  प्रत्येक दिवशी ५० टक्के विद्यार्थी बोलवत असून याप्रमाणे तब्बल ७६ टक्के विद्यार्थी हे शाळांमध्ये येत आहेत.
--
शुल्कांसाठी तक्रारींची तपासणी 
शालेय शुल्कासंदर्भात आम्ही आमची न्यायालयात बाजू  भक्कमपणे ठेवलेली आहे. आयुक्तांनी सांगितलेले आहे, परिस्थिती पाहून त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. मात्र शुल्कांच्या संदर्भात राज्यातील शाळांविरोधात पालकांकडून ज्या तक्रारी मिळाल्या त्या तपासणी करण्याचे काम सुरू आहे.