ओबीसींच्या जागेवरील निवडणुका रद्द

मंत्रालय
 07 Dec 2021  443

 

ओबीसींच्या ४१३ जागांवरील निवडणुकांना
राज्य निवडणूक आयोगाची स्थगिती

एससी, एसटीसह खुल्या प्रवर्गातील १७०८ जागांसाठी निवडणूक

लोकदूत वेबटीम

 मुंबई 7 डिसेंबर 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २१ डिसेंबर २०२१ रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या (ओबीसींच्या) ४१३ जागांवरील निवडणुकांना स्थगिती देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मंगळवारी येथे दिली. दुसरीकडे, ओबीसी जागा वगळता एससी, एसटी आणि खुल्या प्रवर्गातील १७०८ जागांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजीच मतदान होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार राज्यातील १०६ नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील ४ रिक्तपदांच्या आणि ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींतील ७ हजार १३० रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या अधीन राहूनच या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या ६ डिसेंबर २०२१ च्या आदेशानंतर आता या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या जागांवरील निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आल्या आहेत. परंतु अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि सर्वसाधारण खुल्या गटातील जागांसाठीची निवडणूक पूर्व घोषित कार्यक्रमानुसार पुढे सुरू राहील. ओबीसींच्या जागांच्या स्थगित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही मदान यांनी सांगितले.

ओबीसींच्या ४१३ जागांवरील निवडणुका स्थगित

- भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद- २३ (एकूण जागा १०५)

- भंडारा व गोंदियातील १५ पंचायत समित्या- ४५ (एकूण जागा २१०)

- राज्यातील १०६ नगरपंचायती- ३४४ (एकूण जागा १, ८०२)

- महानगरपालिका पोटनिवडणुका- १ (एकूण ४ जागा)

.......