विधानसभा उपाध्यक्ष पदी नरहरी झिरवाळ यांची बिनविरोध निवड

विधिमंडळ
 14 Mar 2020  736

* भाजप आमदार अशोक उईके यांची माघार 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 14 मार्च 

 

  विधानसभा उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ यांची बिनविरोध निवड झाली. भाजप आमदार अशोक उईके यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने झिरवाळ यांची बिनविरोध निवड झाल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत जाहीर केले.

        आमदार झिरवाळ यांची तिसरी आमदारकीची टर्म असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्क्षाचे नेते अजितदादा पवार यांचे अत्यंत जवळचे समर्थक मानले जाते. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या विधानसभा मतदार संघातुन निवडून आले आहे. विधानसभा अध्यक्षांनी निवड जाहीर करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नरहरी झिरवाळ यांना त्यांच्या आसनावरून विरोधी पक्षनेत्यांच्या जवळ असलेल्या उपाध्यक्षांच्या आसनावर विराजमान केले.

      मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल नरहरी झीरवाळ यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव  सभागृहात मांडला. यावेळी झिरवाळ  यांच्या व्यक्तीमहत्वाबद्दल सभागृहात परिचय करुण दिला.प्रचंड अभ्यासु आणि तळागाळातील प्रश्नांची जाण असलेले तसेच तो प्रश्न सोडविण्यासाठी घेत असलेले परिश्रम आपण अनुभवले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सरपंच ते उपाध्यक्ष असा राजकीय प्रवासही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात व्यक्त केला.

          विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या ठरावाला पाठिंबा देत संवेदनशील आणि जनतेमध्ये राहून काम करणारा व्यक्ती आज उपाध्यक्ष पदावर विराजमान होत असल्याचा आनंद व्यक्त केला. बिनविरोध निवड करण्याच्या परंपरेला कायम राखण्यासाठी उमेदवारी मागे घेणारे भाजप आमदार अशोक उइके यांचेही अभिनंदन केले.उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणजे सामान्य माणसाला आपला माणूस वाटणारे व्यक्ती महत्व असल्याचे यावेळी फडणवीस म्हणाले. 

         उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही उपाध्यक्ष झिरवाळ यांचे अभिनंदन करीत सुरूवातीपासूनाचा जीवनपट सभागृहात उलघडला.साध्या माणसांचा साधा आमदार असेही यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले. सभागृहात एकेकाळी बहुतांश टोपीवाले आमदार असत. परंतु आता फ़क्त 6 आमदार असून 1 आता उपाध्यक्ष पदावर विराजमान झाले आहे. आमदार असून शेतात पेरणी करत असतांनाचा फोटो उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात दाखवत तहसील कार्यालयातील क्लर्क ते बिगारी आणि आमदार आता उपाध्यक्ष असा परिचयही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी करुण दिला.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबल यांनीही यावेळी अभिनंदन करीत उपाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.

 

चौकट...... सर्वांना समान न्याय देणार - उपाध्यक्ष झिरवाळ 

आपण आताही सर्वसामान्य व्यक्ती असून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे हेडमास्टर आहे. त्याच बरोबर ते कडक शिस्तीचे असून  आपण मात्र सभागृहातील  सर्व सदस्यांना मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी समान न्याय देणार अशी ग्वाही नवनियुक्त उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सभागृहात दिली. सामान्य व्यक्ती म्हणून जगलेल्या जीवनाची आठवण करीत प्रथमच आमदार झाल्यावर एका पंचतारांकित हॉटेल मध्ये जावून बाहेर असलेल्या रेतीच्या ढिगाऱ्यावर काढलेल्या दिवसही यावेळी सभागृहात व्यक्त केले.सुरुवातीला जनता दल, कोंग्रेस, राष्ट्रवादी असा राजकीय प्रवास करतांना अनेक चढ उतार आले. परंतु त्यापासून मागे सरलो नाही असे सांगत आपण एकच ध्येय ठेवले असून आपल्या घरच्या भिंतीवरही "यश हे अंतिम नसत,अपयश हे घातक नसत,या दोन्ही गोष्टीला सामोरे जाण्यासाठी केवळ ध्यैर्य हव असत" असे वाक्य लिहिले. आणि त्यानुसाराच चालत आल्याचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणाले. मानुस कष्ट करीत राहिला तर नक्कीच चढ़ उतार बाजूला सारतात. सर्वसामान्य म्हणूनही आपण आजवर जगत असतांना मुंबईत माझ्या नियमित हॉटेल ला गेलो तर आजही 10-15 लहान अनाथ मूल जवळ येत असल्याचे सभागृहात सांगितले. यावेळी सर्वांचे आभार मानत राज्यातीलaआदिवासी जनतेसाठी विविध योजना आखल्या तर जंगलतोड़ नक्कीच थांबेल असेही यावेळी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.