एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ - मंत्री अनिल परब

मंत्रालय
 24 Nov 2021  463

 

-10 तारखेच्या आत पगार करण्याची सरकारची हमी
-चालक, वाहकांना मिळणार आता कामाचा लाभांश
-कामावर आल्यास सेवा समाप्ती, निलंबनाच्या कारवाया घेणार मागे
-महामंडळावर महिन्याला ३६०कोटीचा पडणार अतिरक्त बोजा
-कामावर उद्या हजर होण्याचे अनिल परब यांचे आवाहन

लोकदूत वेबटीम 

मुंबई 24 नोव्हेंबर 


3 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचा संप मागे घ्यावा म्हणून राज्य सरकारने बुधवारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात  ४१ टक्के (अंतरीम) वेतनवाढ जाहीर केली. तसेच संपकाळात करण्यात आलेल्या सेवा समाप्ती व निलंबनाच्या सर्व कारवांया मागे घेण्यात येतील आणि वेतन १० तारखेच्या आत होईल अशी हमी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे माध्यमांशी बोलताना परब म्हणाले की, एसटी महामंडळाचे राज्य सरकारात विलिनीकरणाच्या मागणीवर शासनाची भूमिका उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याची आहे. समितीचा अहवाल येण्यास आणखी ८ ते १० आठवडे बाकी आहेत. मात्र संपावर तोडगा निघावा म्हणून कर्मचाऱ्यांच्या वेतानात वाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------
-पॅकेज असे :
-१ ते १० वर्ष श्रेणी:
जे कर्मचारी १ ते १० वर्ष या श्रेणीत आहेत, या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ठोक ५ हजारांची वेतनवाढ. ज्याचे मूळ वेतन १२ हजार ०८० रुपये होते, त्याचे वेतन आता १७ हजार ३९५ होईल. त्यामुळे मूळ वेतन १७ हजार ०८० वरून आता २४ हजार ५८४ रुपये होईल. जवळपास ७ हजार २०० रुपयांची (४१ टक्के) पगारवाढ आहे.
-१० ते २० वर्ष :
१० ते २० वर्षांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४ हजारांची वाढ केली आहे. त्यामुळे त्यांचा पूर्ण पगार २३ हजार ०४० होता तो आता २८ हजार ८०० रुपये झाला आहे.
-२० वर्ष व अधिक :
२० वर्षांहून अधिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात २ हजार ५०० रुपयांनी वाढ.  मूळ वेतन २६ हजार आणि स्थूल वेतन ३७ हजार ४४० होते, त्यांचे वेतन आता ४१ हजार ०४० होईल. ज्याचे मूळ वेतन ३७ हजार होते आणि स्थूल वेतन ५३ हजार २८० होते, त्यांना २५०० रुपयांची वाढ होईल. तर मूळ वेतन ३९ हजार ५०० तर स्थूल वेतन ५६ हजार ८८० होईल.
-----------------
-अॅड. परब म्हणाले,
1. काही कामगारांनी आर्थिक समस्येमुळे आत्महत्या केल्या. म्हणून राज्य शासनाने त्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या १० तारखेच्या आधी होईल, अशी हमी घेतली आहे.
२. कर्मचाऱ्यांसाठी यापुढे इन्सेन्टिवची योजना असेल. एसटीचे उत्पन्न वाढल्यावर ते उत्पन्न वाढवण्यासाठी ड्रायव्हर, कंडक्टरने चांगले काम केले तर त्यांना लाभ मिळेल.
३. आत्महत्या केलेल्या कामगारांचा शासन सहानुभूतिपूर्वक विचार करेल.
४. ड्युटी नसल्यामुळे कामगाराची रजा भरून घेतली जात असे. यापुढे, जो कामगार कामावर हजेरी लावेल, त्याला त्या दिवसाचा पगार मिळेल.
५. कामगार जे उद्या सकाळी ८ वाजता नोकरीच्या ठिकाणी हजर होतील, त्यांचे निलंबन व सेवा समाप्तीची कारवाई मागे घेतली जाईल. मुंबईत मोर्चासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी परवा कामावर हजर व्हावे.
६. या पगारवाढीसाठी प्रत्येक महिन्याला ६० कोटींचा अतिरिक्त बोजा महामंडळावर पडेल. तर महिन्याला ३६० कोटींचा बोजा येईल.
-----------------------------------