शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री घेणार निर्णय

मंत्रालय
 17 Nov 2021  452

शाळा प्रारंभाचा संभ्रम कायम
-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतरच होणार निर्णय
- उपमुख्यमत्री अजित पवार व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

लोकदूत वेबटीम 

 मुंबई17 नोव्हेंबर 


१ ते ५ पर्यंतच्या राज्यातील शाळा प्रारंभाचा संभ्रम अद्यापही कायम आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक झाल्यानंतरच उर्वरित शाळांचे वर्ग चालु करण्यासंदर्भात निर्णय होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी (ता.१७) प्रसिद्धी माध्यमांना दिली.
सध्या शहरी भागात ८ ते १२ आणि ग्रामीण भागात ५ ते १२ पर्यंतच्या शाळा सुरु आहेत. दिवाळी सुट्टीनंतर ११ आणि १५ नोव्हेंबरपासुन हे वर्ग सुरु झाले आहेत. मात्र उर्वरित वर्ग केव्हा भरणार याची काही निश्चित नाही. शिक्षण संस्था व पालक यांच्याकडुन उर्वरित शाळा सुरु करण्याची मोठी मागणी आहे.

आज विधिमंडळात शाळांच्या संच मान्यतेसंदर्भात शिक्षक आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री यांची बैठक पार पडली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की,  ग्रामीण भागातील १ ते ४ वी आणि शहरी भागातील १ ते ७ वी पर्यंतचे उर्वरित वर्ग सुरु करण्याची शिक्षण विभागाची तयारी आहे. मात्र मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतर त्याबाबतचा निर्णय होईल, असे त्या म्हणाल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (ता.१६) उर्वरित शाळा सुरु करण्यासंदर्भात बैठक घेतली. त्यामध्ये पुढच्या १५ दिवसात शाळा सुरु करणे शक्य असल्याचा सूर निघाला. मात्र मुख्यमंत्री हे प्रथम राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील आणि त्यानंतरच शाळांचा निर्णय होईल, असे पवार म्हणाले.

एकुण १ डिसेंबर पासून राज्यातील शाळांचे सर्व वर्ग सुरु होण्याचे संकेत असल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
-------------