शिवस्मारकाला एक वर्षाची मुदतवाढ

मंत्रालय
 18 Oct 2021  433

-कामावरची बंदी न उठवता सरकारकडून मुदवाढीची औपचारितका पूर्ण
- कोणतीही भाववाढ न करता दिली मुदतवाढ

लोकदूत वेबटीम

मुंबई 18 ऑक्टोबर 


अरबी समुद्रात बांधण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाला राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. २८९० कोटींच्या कंत्राटात कोणतीही भाववाढ न करता दिलेली वाढीव मुदत आता १८ आॅक्टोबर २०२२ पर्यंत असणार आहे.

१९ आॅक्टोबर २०१८ मध्ये शिवस्मारकाच्या कामाच्या कार्यारंभ मे. एल अँड टी या कंपनीस देण्यात आलेला होता. मात्र पर्यावरणीय सुनावण्या न घेतल्याने सर्वोच्च न्यायालयाने प्रकल्पाचे काम जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले हाेते परिणामी, प्रकल्पाचे कोणतेही काम अद्याप झालेले नाही.

सार्वजनिक बांधकामचा मुंबई विभाग शिवस्माराक प्रकल्पाच्या कामाचे मुख्य प्राधिकरण आहे. तसेच प्रकल्पासाठी स्वतंत्र प्रकल्प विभागही आहे. या विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला एक वर्षाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार ५ आॅक्टोबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

अशोक चव्हाण मंत्री असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागास स्मारकाच्या कामात काडीचा रस नाही. त्यामुळे शिवस्मारकाच्या कामावरची न्यायालयाची बंदी उठवण्याचे काेणतेही प्रयत्न मंत्री चव्हाण यांच्या विभागाने दोन वर्षात केलेले नाहीत. परिणामी, प्रकल्पस्थळी समुद्राच्या मोटात भूस्थराची चाचपणी करण्यापलीकडे कोणतेही काम एल अँड टी कंपनी करु शकलेली नाही.

मंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी शिवस्मारक प्रकल्प असून अडचण नसून खोळंबा झाला आहे. या प्रकल्याच्या पर्यावरणीय सुनावण्या बाकी आहेत. त्या घेऊन न्यायालयाचा जैसे थे आदेश उठवावा लागणार आहे. मात्र ते काहीही न करता एका वर्षाची मुदतवाढ देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने कर्तव्य उरकले आहे.

भारताचे महाभिलेखापरिक्षक (कॅग) यांनी प्रकल्पाच्या निविदांवर आक्षेप घेतलेले आहेत. त्यावर उपाययोजना केल्याशिवाय मंत्री अशोक चव्हाण पुढे जाण्यास तयार नाहीत. मात्र प्रकल्पाला मुदतवाढ न दिल्यास विरोधक राजकारण करु शकतात. अगोदरच मराठा आरक्षणामुळे अशोक चव्हाण मोठ्या टिकेचे धनी झाले आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी आणखी डोकेदुखी वाढू नये, म्हणून बिनकामाची मुदतवाढ दिल्याचे समजते.
------------
शिवस्मारक नरिमन पॉईंटपासून 5 किलोमीटर अंतरावर समुद्रत असेल. एका खडकाळ भागावर 15 हेक्टर जागेत उभारले जाईल. स्मारकाच्या भूभागावर हेलीपॅडही असून गिरगाव चौपाटी आणि नरिमन पॉईंटला पर्यटकांसाठी जेट्टी उभारण्यात येणार आहे. दररोज 10,000 पर्यटक स्मारकाला भेट देतील. स्मारकाची उंची 212 मीटर असणार आहे.