मंत्री अमित देशमुख यांचा ऐतिहासिक निर्णय

मंत्रालय
 07 Oct 2021  3455

* ठराविक डॉक्टरांची मनमानी संपुष्टात 

* वैद्यकीय शिक्षण आयुक्त म्हणून ias वीरेंद्र सिंह यांची नियुक्ती 

 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 6 ऑक्टोबर 

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागातील काही डॉक्टरांची मनमानी आता संपुष्टात आली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या भविष्यासाठी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी ऐतिहासिक असा धोरणात्मक निर्णय घेऊन आज मंत्रीमंडळाची मंजुरी घेतली आहे. म्हणूनच आजपासून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आयुक्त पदी वीरेंद्र सिंह या सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे. वीरेंद्र सिंह हे पहिले वैद्यकीय शिक्षण आयुक्त असून ते 2006 बॅच चे सनदी अधिकारी आहे. त्यांनी नागपूर मनपा आयुक्त तसेच नगरपालिका प्रशासन संचालक म्हणून कामकाज केले आहे.

 

     सार्वजनिक आरोग्य विभागापासून वैद्यकीय शिक्षण विभाग स्वतंत्र होऊन तब्बल तीन दशक उलटून गेली आहे. त्यामुळेच वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा कारभार संचालक यांच्या हाती होता. या पदावर या विभागातील वरिष्ठ डॉक्टर कार्यरत असतात. मात्र वाढत कारभार पाहता सार्वजनिक आरोग्य विभागात ias अधिकाऱ्याची आयुक्त म्हणून काही वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने निर्णय घेतला. मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार संचालक पदी विराजमान असलेल्या संचालकांच्या माध्यमातून हाकला जात होता. 

   परंतु डॉक्टरांना प्रशासकीय ज्ञान कमी असल्यामुळे प्रशासकीय बाबी आणि धोरणात्मक निर्णय घेतांना वैद्यकीय शिक्षण विभागाची अडचण निर्माण होत होती. शिवाय राज्य सरकारचे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय रुग्णालय निर्माण करण्याचे धोरण असल्याने वैद्यकीय शिक्षण संचालक कार्यालयाचा मोठा पसारा वाढला होता. त्यामुळे प्रशासकीय अनागोंदी मोठ्याप्रमाणात निर्माण होत होती. म्हणून प्रशासकीय कारभार हाताळणे आणि धोरणात्मक निर्णय वैद्यकीय शिक्षण बाबत घेणे याकरिता वैद्यकीय शिक्षण आयुक्त पद निर्माण करून ias अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्री अमित देशमुख यांनी घेतला. यावर तात्काळ पाऊले टाकत याबाबत मंत्रिमंडळाची  मंजुरी घेऊन राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आयुक्त पदी सनदी अधिकारी वीरेंद्र सिंह यांची नियुक्ती केली आहे. हा निर्णय वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचा असून या विभागात सुरु असलेला प्रशासकीय अनागोंदी कारभार आता रुळावर येणार आहे.

   शिवाय वैद्यकीय शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरु असून मेडिकल हॉस्पिटल नुसार डॉक्टरांचे गट निर्माण झाले आहे. त्यामुळे हॉस्पिटल हे काही डॉक्टरांना आपलेच संस्थान वाटू लागल्याने मोठ्या प्रमाणात कारभार ढेपाळला होता. अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी एकाच वैद्यकीय महाविद्यालयात ठाण मांडून बसले आहे. त्यामुळे आता आयुक्त म्हणून सनदी अधिकारी विराजमान होणार असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागातील मनमानी कारभार करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले असून एकप्रकारे मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षणाचे भविष्य उंचावण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन डॉक्टरांच्या मनमानीला चाप लावण्यात यशस्वी झालेaआहे.