खा. भावना गवळींना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली

मंत्रालय
 01 Oct 2021  464

 

'वर्षा' निवासस्थानी दोन तास थांबून परतल्या सेना खासदार

लोकदूत वेबटीम 

 मुंबई 1ऑक्टोबर 


पैशाची अफारातफर (मनी लॉण्ड्रिंग) प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा मागे लागलेल्या शिवसेनेच्या यवतमाळ- वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी भेट नाकारली. गवळी या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दोन तास थांबल्या, मात्र त्यांना उद्धव यांनी भेट दिली नसल्याचे समजते.

भावना गवळी यांच्या निकटवर्तीय सईद खान यांना सक्तवसुली संचालनालयाने नुकतीच अटक केली आहे. खासदार गवळी यांच्या बालाजी पार्टिकल बोर्ड कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात ईडीने गवळी यांच्याशी संबंधित असलेल्या यवतमाळ व वाशिम येथील पाच संस्थांवर याआधीच छापे टाकले होते.

भावना गवळीशी संबंधित पाच संस्थांच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली होती. गवळी यांच्या एका संस्थेच्या कार्यालयातून ७ कोटी रुपये चोरीला गेल्याची तक्रार स्वत: गवळी यांनी केली होती. त्या तक्रारीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळी यांच्या चौकशीची मागणीही केली होती. तेव्हापासून गवळी ईडीच्या रडारवर असून त्यांच्यावर झालेल्या आरोपांची शहानिशा ईडीकडून केली जात आहे.

त्या पार्श्वभूमीवर खासदार गवळी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आल्या होत्या. त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दुपारी १२ वाजता पोचल्या. मुख्यमंत्री बैठकीत होते. अडीच वाजेपर्यंत गवळी यांनी वाट पाहिली. मात्र मुख्यमंत्री त्यांना भेटू शकले नाहीत. शेवटी त्यांना आज साहेब भेटणार नाहीत, असे सांगण्यात आले.

त्यानंतर खासदार गवळी वर्षा येथून बाहेर पडल्या. यासंदर्भात गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. भावना गवळी या मनी लाँड्रींग प्रकरणात सापडल्याने त्या मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतून उतरल्या असल्याचे संकेत आहेत. एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा मागे लागला असतानाच स्वपक्षातून पाठिंबा मिळत नसल्याने खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढत जाणार आहेत.
---------------