प्रभाग रचनेवरून काँग्रेस तोंडघशी

मंत्रालय
 28 Sep 2021  478

राज्यातील महापालिकांमध्ये तीन
सदस्यीय प्रभाग पध्दतीवर शिक्कामोर्तब


लोक दूत वेबटीम 

मुंबई 28 सप्टेंबर 

मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगर पालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीवर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा शिक्कामोर्बत झाले आहे. काँग्रेसने तीन सदस्यांऐवजी दोन सदस्यीय प्रभाग पध्दतीचा आग्रह धरला होता. पण आता काँग्रेसचा विरोध मावळला असून पुढील निवडणुका तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसारच होतील.
मागील आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत  आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीन तर नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पध्दती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र काँग्रेसने या निर्णयाला विरोध केला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत ठराव झाला होता. तीन सदस्यीय  प्रभाग पध्दती रद्द करून ती दोन सदस्यीय करावी असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे अडीच तास यावर साधक बाधक चर्चा करण्यात आली ही प्रभाग रचना महाविकास आघाडीला   फायद्याची असल्याचे काँग्रेसच्या निदर्शनास आणण्यात आले.  प्रभाग रचनेवर महाविकास आघाडीत आधीच चर्चा झाली आहे.  मोठी प्रभाग रचना ही महाविकास आघाडीसाठी सोयीची ठरेल, असेही काँग्रेसला पटवून देण्यात आले. त्यानंतर  काँग्रेसचा विरोध मावळला असे सांगण्यात येते.

..................