रद्द झालेली आरोग्य विभागाची परीक्षा होणार या तारखेला

मंत्रालय
 28 Sep 2021  469

आरोग्य विभागाच्या परिक्षा २४ व ३१ आॅक्टोबर रोजी
-९ दिवस पूर्वी परिक्षार्थींना मिळणार हाॅल तिकीट
 

लोकदूत वेबटीम 

मुंबई 28 सप्टेंबर 

आरोग्य विभागाच्या पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षांच्या नव्या तारखा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जाहीर केल्या. गट क वर्गातील कर्मचाऱ्यांसाठीची परिक्षा २४ आॅक्टोबर रोजी तर गट ड वर्गातील कर्मचाऱ्यांसाठीची परिक्षा ३१ आॅक्टोबर रोजी होणार आहे.

मंत्रालयात आज अधिकाऱ्यांची टोपे यांनी बैठक घेतली. त्यामध्ये परिक्षांच्या गोंधळाचा आढावा घेण्यात आला. आता ९ दिवस पूर्वी परिक्षार्थींना हाॅल तिकीट प्राप्त होणार आहे. तसेेच आरोग्य  विभागाच्या परिक्षांसदर्भात डॅश बोर्ड करण्यात येणार असून त्यावर परिक्षा केंद्रे, विद्यार्थ्यांच्या याद्या, वेळापत्रक आदींची माहिती सार्वजनिक केली जाणार आहे.

या परिक्षासंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला या परिक्षांसंदर्भात काही वावगे होत असल्याचे आढळल्यास पोलीसांत तक्रार करा, असे आवाहन मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. बैठकीला रामास्वामी, अर्चना पाटील, सतीश पवार हे विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच परिक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या न्यासा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

न्यासा कंपनीची निवड आयटी विभागाने केलेली आहे. तसेच आयटी विभाग हा सामान्य प्रशासनाच्या अंतर्गत येतो. या विभागाने परिक्षा घेण्यासाठी काही कंपन्या निवडलेल्या आहेत. ती निवड फडणवीस सरकारच्या काळात झाली होती, असा दावा मंत्री राजेश टोपे यांनी केला.

आरोग्य विभागात क आणि ड वर्गातील ६ हजार २५० उमेदवारांची भरती होणार आहे. त्यासाठी २५ व २६ सप्टेंबर रोजी परिक्षा होणार होती. मात्र हाॅल तिकीट वेळेवर न मिळाल्याने तसेच चुकीची परिक्षा केंद्रे दिल्याने परिक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आली होती.
------------------------------------------------
आरोग्य विभागातील या नोकर भरतीसाठी ८ आणि १५ लाख रुपये घेतले जात आहेत, अशी ध्वनीचित्रफीत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आज जारी केली. त्यावर टोपे यांना विचारले असता, त्या चित्रफितीची सत्यता किती हा प्रश्न आहे, असे काही होत असल्यास पोलीसांत तक्रार करा, असे टोपे यांनी आवाहन केले.
--------------------------------